"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:44 PM2024-05-13T23:44:20+5:302024-05-13T23:46:46+5:30
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केले आहे.
कोलकाता : लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या मित्रपक्षांसह भाजपाने 400 चा आकडा पार करण्याचा नारा दिला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी 400 पार करण्याच्या भाजपाच्या दाव्यावर आपला अंदाज व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला 200 पेक्षा कमी म्हणजे 195 जागा मिळतील आणि इंडिया ब्लॉक (इंडिया अलायन्स) किमान 315 जागा जिंकेल, असा अंदाज ममता बॅनर्जी यांनी वर्तवला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बनगाव लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रॅलीला संबोधित केले. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आतापर्यंत मतदान चांगले झाले आहे. त्यामुळे केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे नेते तणावाखाली आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, याची जाणीव त्यांना झाली आहे. यापुढे 400 जागांची बढाई त्यांनी मारू नये.
पुढे ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपा फक्त 195 जागा जिंकेल तर इंडिया ब्लॉक 315 जागा जिंकेल. मतुआ समुदायाच्या लोकांना नागरिकत्व मिळविण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांतर्गत (सीएए) अर्ज भरावा लागेल. जर पंतप्रधानांचे मतुआंवर इतके प्रेम असेल तर त्यांनी त्यांना सीसीए फॉर्म भरण्यास न सांगता नागरिकत्व द्यावे. आम्ही कोणत्याही किंमतीत सीएएची अंमलबजावणी थांबवण्यासाठी वचनबद्ध आहोत.
संदेशखळीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाला धारेवर धरले. संदेशखळीमध्ये अशांतता निर्माण करून पश्चिम बंगालची प्रतिमा खराब करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. भाजपा संदेशखळीतील महिलांचा अपमान करत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच, बॅरकपूर येथील निवडणूक सभेत पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पाच कलमी गॅरंटीचीही ममता बॅनर्जींनी खिल्ली उडवली. अशा गॅरंटी निराधार असल्याने त्या कधीच पूर्ण होणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.