...तर जेलमध्ये राहणं पसंत करेन, ममता बॅनर्जींचा केंद्रावर थेट निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 04:49 PM2020-12-07T16:49:42+5:302020-12-07T16:50:56+5:30
पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा जागांवर पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.
मिदनापूर -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कृषी कायद्यांवरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. ममतांनी म्हटले आहे, की भाजप सरकारने लवकरात लवकर कृषी कायदे परत घ्यावेत. अथवा सत्ता सोडावी. पश्चिम मिदनापूर येथे एका रॅलीला संबोधित करताना ममता म्हणाल्या, ‘‘बीजेपीच्या वाईट कारभारावर शांत रहण्याऐवजी अथवा ते सहन करण्याऐवजी, जेलमध्ये राहणे पसंत करेल.’’
ममतांनी दावा केला, की ‘‘भाजप सरकारने लवकरात लवकर कृषी कायदे परत घ्यावेत अथवा सत्ता सोडावी. शेतकऱ्यांच्या अधिकारांवर घाला घातल्यानंतर सत्तेत राहणे योग्य नाही.’’ भाजपला ‘‘बाहेरील लोकांचा पक्ष’’ म्हणत ममतांनी, त्या बंगालमध्ये कधीही भगव्या पक्षाचा कब्जा होऊ देणार नाही, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर लोकांनाही आवाहन केले, की त्यांनीही अशा प्रयत्नांना विरोध करावा.
त्या म्हणाल्या, त्यांचा पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास, पुढच्या वर्षी जून महिन्यानंतरही मोफत रेशन देण्यात येईल. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा जागांवर पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.
...त्यांनी तृणमूल सोडले तरी चालेल; निवडणुकीआधी ममता बॅनर्जींनी भरला दम -
तत्पूर्वी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील स्थानिक पक्ष असलेल्या तृणमूलमध्ये पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. एक आमदार आधीच भाजपात डेरेदाखल झाला. तर काही दिवसांपूर्वी पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक आणि ममतांचे मंत्री अधिकारी यांनी राजीनामा दिला होता. त्याच्यासोबतची शिष्टाई यशस्वी ठरल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षातील नेत्यांना दम भरला होता.
ममता यांनी पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, जे लोक पक्ष विरोधी कारवाया करत आहेत, विरोधी पक्षाच्या संपर्कात आहेत ते पक्ष सोडण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे म्हटले होते. ममता यांनी नाव घेतले नसले तरीही त्यांचा हा इशारा नाराज असलेले नेते शुभेंदू अधिकारी आणि पक्षाच्या विरोधात बोलणारे काही नेते, आमदार यांच्यासाठी होता.