...तर कोलकातामधील 'त्या' डॉक्टर हत्येचा तपास आता 'सीबीआय'कडे- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 01:40 PM2024-08-13T13:40:36+5:302024-08-13T13:46:31+5:30
सलग चौथ्या दिवशीही कनिष्ठ डॉक्टरांचे आंदोलन
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरवर करण्यात आलेला बलात्कार व हत्या प्रकरणाचा छडा येत्या रविवारपर्यंत पोलिसांनी न लावल्यास या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली. या हत्येची न्यायालयीन चौकशी करावी, या मागणीसाठी कनिष्ठ डॉक्टर, इंटर्न आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींनी सलग चौथ्या दिवशी, सोमवारी काम बंद आंदोलन सुरू ठेवले असून, राज्यभरातील रुग्णालय सेवा विस्कळीत झाली आहे.
घटना घडलेल्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राचार्य संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पश्चिम बंगाल सरकारने वैद्यकीय अधीक्षक तसेच उपप्राचार्य संजय वशिष्ठ यांना त्या पदावरून हटविले. या प्रकरणी शनिवारी एका संशयिताला अटक करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
खटला जलदगती न्यायालयात
- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, महिला डॉक्टरची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर पकडावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
- या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात येईल. महिला डॉक्टर प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचे एक पथक कोलकात्यात आले असून ते पोलीस अधिकारी व डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सर्व माहिती जाणून घेणार आहे.
- या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी करणाऱ्या तीन जनहित याचिका कोलकाता उच्च न्यायालयात सादर करण्यात आल्या आहेत.
दिल्लीतही आंदोलन
- कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील १० सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांनीदेखील सोमवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे.
- त्यामुळे दिल्लीतील वैद्यकीय सेवांवर परिणाम झाला आहे. महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणात न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.