मंत्री लक्ष्मी रतन शुक्लांच्या राजीनाम्यावर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया; म्हणाल्या...
By जयदीप दाभोळकर | Published: January 5, 2021 05:56 PM2021-01-05T17:56:09+5:302021-01-05T17:59:44+5:30
ममता सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, या निवडणुकीपूर्वीच तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसणं सुरूच आहे. आता, ममता सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते पक्षातून बाहेर पडतील अशा चर्चा राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसंच त्यांनी शुक्ला यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रियाही दिली आहे.
"कोणीही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतं," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. "त्यांना खेळासाठी आपला अधिक वेळ द्यायचा आहे. ते आमदार म्हणून कायम राहतील. आपला राजीनामा नकारात्मक पद्धतीनं घेतला जाऊ नये," असं त्यांनी राजीनाम्याच्या पत्रात लिहिलं असल्याचं ममता बॅनर्जी यांनी नमूद केलं.
Anyone can resign. He (Laxmi Ratan Shukla) wrote in his resignation letter that he wants to give more time to sports and will continue as an MLA. Don't take it in a negative way: West Bengal CM Mamata Banerjee https://t.co/ivR97RIoTwpic.twitter.com/xL0hztp5KX
— ANI (@ANI) January 5, 2021
लक्ष्मी रतन शुक्ला हे भारतासाठी तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय ते आयपीएलमध्येही कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेविल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते राजकारणात आले. ते बंगालच्या उत्तर हावडातून आमदारही झाले. यानंतर ममता सरकारमध्ये त्यांना क्रीडामंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली होती.
अनेक नेते सोडतायत टीएमसीची साथ
पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या मे महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. मात्र, त्यापूर्वी टीएमसीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सर्वप्रथम सुवेंदू अधिकारी यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत पक्ष सोडला आणि ते भाजपत दाखल झाले. त्यांच्याशिवाय त्यांचे अनेक समर्थक आणि टीएमसी आमदारही पक्ष सोडून भाजपत गेले. पक्षात अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांचा दबदबा वाढल्यापासून पक्षाचे काम व्यवस्थितपणे सुरू नाही, असा आरोप टीएमसीला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांनी केला आहे. "काही जणांना नेल्याने त्यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. बंगालमध्ये टीएमसीचेच सरकार बनेल," असं ममता बॅनर्जी यापूर्वी म्हणाल्या होत्या.