'म्हणतात ठोक दो, ठोक दो..., जर आम्ही एक झालो तर...'; ईदीच्या शुभेच्छा देत ममतांचा भाजपवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 03:09 PM2023-04-22T15:09:41+5:302023-04-22T15:10:19+5:30
जर आपण लोकशाहीचे रक्षण करण्यात अयशस्वी झालो, तर सर्व नष्ट होईल. आज संविधान बदलले जात आहे, इतिहास बदलला जात आहे.
आम्हाला दंगली संघर्ष नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे. आम्हाला देशाचे विभाजन करायचे नाही. मी मरेन, पण देशाचे विभाजन होऊ देणार नाही. मात्र काही लोक भाजपकडून पैसे घेतात आणि आम्ही मुस्लीम मते फोडू, असे म्हणतात, पण असे होऊ शकत नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या ईद निमित्त आयोजित एका कार्यक्रमात शुभेच्छा देताना बोलत होत्या.
कार्यक्रमाला संबोधित करताना ममता म्हणाल्या, मी अर्थिक शक्ती आणि केंद्रीय एजन्सींसोबत लढायला तयार आहे. पण मी वाकणार नाही. आपल्या देशात कुणाची सत्ता येणार हे ठरवण्यासाठी वर्षभरात निवडणुका होणार आहेत. आपण संघटित होऊन फूटीर शक्तींचा सामना करण्यासाठी वचनबद्ध होऊयात. जर आपण लोकशाहीचे रक्षण करण्यात अयशस्वी झालो, तर सर्व नष्ट होईल. आज संविधान बदलले जात आहे, इतिहास बदलला जात आहे.
यावेळी ममता यांनी एनआरसीच्या मुद्द्यालाही हात घातला. त्या म्हणाल्या, NRC लागू करण्याची त्यांची इच्छा आहे. पण मी असे होऊ देणार नाही. कुणाचाही उल्लेख न करता ममता म्हणाल्या, एक नेता तो असतो, जो फुटीरतावाद्यांच्या विरोधात जाऊन सर्वांची काळजी घेतो. पण ते आम्हाला प्रचंड त्रास देतात. त्याची दादागिरी आणि फक्त बोलणे थांबावे, अशी मी अल्लाहला प्रार्थना करतो.
एवढेच नाही, तर "ते म्हणतात ठोक दो, ठोक दो..., अरे ठोक दो काय? जर आम्ही एकत्र आलो, तर तुमची खुर्ची कोसळेल," असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. यावेळी बिल्किस बानो प्रकरणाबाबत ममता म्हणाल्या, या प्रकरणात सर्वांची सुटका झाली आहे, पण आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही लढणार आणि जिंकणार. नेत्यांनी नेहमीच एकी कायम ठेवायला हवी. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की आम्हाला शक्ती दे. आपण संघटित राहिलो, तर मला खात्री आहे की, ते सत्तेतून बाहेर फेकले जातील, असेही ममता यावेळी म्हणाल्या.