अतूट नातं! कोरोनात पत्नी गमावली, बनवला सिलिकॉनचा पुतळा; आता रोज मारतात गप्पा अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 05:41 PM2023-01-02T17:41:58+5:302023-01-02T17:49:15+5:30
तपस यांचे पत्नीवरील प्रेम आणि इंद्राणी यांचा पुतळा हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
कोलकाता येथील 65 वर्षीय तपस शांडिल्य यांनी त्यांच्या दिवंगत पत्नीचा सिलिकॉनचा पुतळा बनवला आहे. त्यांची पत्नी इंद्राणी यांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता. यानंतर तपस यांनी पत्नीचा पुतळा बनवण्यासाठी अडीच लाख रुपये खर्च केले. तपस आपल्या पत्नीप्रमाणे या पुतळ्याची काळजी घेतात. दररोज ते तिला कपडे घालतात, सोन्याचे दागिने घालतात आणि तिच्याशी बोलतात, गप्पा मारतात.
तपस यांचे पत्नीवरील प्रेम आणि इंद्राणी यांचा पुतळा हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. कैखली भागात राहणारे तपस सिंह हे निवृत्त केंद्रीय कर्मचारी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सुमारे दहा वर्षांपूर्वी पत्नीसह मायापूरमधील इस्कॉन मंदिरात गेले होते. येथे दोघांनीही ए. सी. भक्तिवेदांत स्वामींची मूर्ती पाहिली, ज्यांनी त्यांना खूप प्रभावित केले. त्यामुळेच इंद्राणी यांनी तपस यांना सांगितले की, जर मी मेले तर तुम्ही माझ्यासारखाच पुतळा करून घ्या.
इंद्राणी यांनी हे गमतीने सांगितलं होतं पण तपस यांनी हे खरं केलं. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत इंद्राणी यांना संसर्ग झाला, त्यानंतर 4 मे 2021 रोजी त्यांचा मृत्यू झाला. तपस यांनी आपल्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी सिलिकॉनचा पुतळा बनवणाऱ्या लोकांबद्दल इंटरनेटवर सर्च केलं. त्यांनी आपल्या पत्नीचा पुतळा बनवण्याची जबाबदारी शिल्पकार सुबीमल दास यांच्यावर सोपवली. इंद्राणीची मूर्ती बनवण्यासाठी सुबीमल यांनी तपस यांच्याकडे पत्नीचे फोटो मागितले.
सुबीमल सांगतात की, सर्वप्रथम त्यांनी मातीचे मॉडेल बनवले, नंतर फायबर मोल्डिंग आणि सिलिकॉन कास्टिंग केले. या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी आणि अडीच लाख रुपये खर्च झाले. आता तपस यांच्या घरी येणार्या सर्वांनाच असं वाटत नाही की इंद्राणी आता त्यांच्यासोबत आहेत. या पुतळ्याचे वजन 30 किलो आहे, तपस पुतळ्याला पत्नीप्रमाणे सोन्याचे दागिने घालतात. सुरुवातीला माझे अनेक नातेवाईक या निर्णयाच्या विरोधात होते. मात्र, नंतर सर्वच माझ्या आग्रहापुढे झुकले असं तपस यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"