West Bengal Lockdown: पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन; शाळा-कॉलेज बंद, दिल्ली-मुंबई फ्लाइट आठवड्यातून फक्त दोनदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 05:48 PM2022-01-02T17:48:56+5:302022-01-02T17:49:10+5:30
West Bengal Corona: कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ आणि ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये सरकारने हे नियम लागू केले आहेत.
कोलकाता: मागील काही दिवसांपासून होत असलेली कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ आणि ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये सरकारने कठोर नियम लागू केले आहेत. सोमवार(3 जानेवारी)पासून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आणि कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विमानांना दोन दिवस परवानगी
यासोबतच राज्य सरकारने दिल्ली आणि मुंबईहून येणाऱ्या विमानांना आठवड्यातून दोनदाच उड्डाण करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोना विषाणू आणि ओमिक्रॉन प्रकारांची सर्वाधिक प्रकरणे आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तर, कोलकाता ते ब्रिटनचे साप्ताहिक विमान याआधीच रद्द करण्यात आले आहे.
West Bengal imposes fresh curbs amid the Covid surge
— ANI (@ANI) January 2, 2022
"West Bengal to operate flights from Delhi and Mumbai only twice a week which will be on Monday and Tuesday w.e.f Jan 5," West Bengal Chief Secretary said pic.twitter.com/sqYulEgQTj
ममता बॅनर्जींनी रद्द केला कार्यक्रम
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर सद्यस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी नेताजी इनडोअर स्टेडियमवर होणारा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे. मुख्य सचिव एचके द्विवेदी यांनी सांगितले की, बंगालमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे उद्यापासून बंद राहतील. खासगी आणि सरकारी कार्यालयातील उपस्थिती 50 टक्क्यांपर्यंत कमी असेल. तसेच, आठवड्यातून दोन दिवस (सोमवार आणि शुक्रवारी) मुंबई आणि दिल्लीहून उड्डाणे चालतील.
हे निर्बंध लादण्यात आले
- 3 जानेवारीपासून सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद राहणार आहेत.
- सर्व कार्यालयांमध्ये केवळ 50 टक्के उपस्थितीची परवानगी असेल.
- सर्व जलतरण तलाव, स्पा आणि ब्युटी पार्लर बंद राहतील.
- पर्यटन स्थळे, प्राणीसंग्रहालय, सिनेमागृहे बंद राहतील.
- शॉपिंग मॉल्समध्ये फक्त 50 टक्केच हजेरी लावता येईल.
- सभा, हॉल आणि कॉन्फरन्समध्ये 50 टक्के उपस्थितीची परवानगी असेल.
- लोकल गाड्या 50 टक्के क्षमतेने धावतील आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच चालू राहतील.
- मेट्रोही 50 टक्के क्षमतेने धावणार आहे.
- होम डिलिव्हरी करताना प्रोटोकॉल पाळावा लागतो.
- रात्री 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल,
- या काळात केवळ अत्यावश्यक सेवांना सूट असेल.