VIDEO: दरोडेखोरांना एकटाच भिडला पोलीस अधिकारी; शूटआऊटच सुरु होताच...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 02:44 PM2024-06-12T14:44:47+5:302024-06-12T14:56:59+5:30

पश्चिम बंगालमध्ये एका दरोड्याचा थरार पाहायला मिळाला. याप्रकरणी सात आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.

West Bengal Criminal escaping after robbing a jewelry showroom arrested | VIDEO: दरोडेखोरांना एकटाच भिडला पोलीस अधिकारी; शूटआऊटच सुरु होताच...

VIDEO: दरोडेखोरांना एकटाच भिडला पोलीस अधिकारी; शूटआऊटच सुरु होताच...

West Bengal Crime : पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील ज्वेलरी शोरूममध्ये दरोडा टाकून पळून गेलेल्या गुन्हेगाराला पकडण्यात गिरिडीह पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलीस पथकाने चोरीच्या गाडीसह काही लुटलेले दागिने व काडतुसे जप्त केली आहेत. मात्र त्याआधी एक पोलीस अधिकारी ७ सशस्त्र दरोडेखोरांना भिडला होता. चार कोटींच्या दरोड्यानंतर पळून जाणाऱ्या दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न एकट्या पोलीस अधिकाऱ्याने केला. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली. मात्र पोलीस अधिकारी आणि दरोडेखोरांच्या संघर्षाचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या घटनेचे फुटेज आता समोर आलं आहे.

पश्चिम बंगालमधील आसनसोल जिल्ह्यातील राणीगंज इथल्या सोन्याच्या दागिन्यांच्या शोरूममध्ये रविवारी दरोडा पडला. दरोडेखोरांनी दरोड्यानंतर तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेच उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला आत काहीतरी गडबड सुरु असल्याचे दिसले. तितक्यात दरोडेखोर बाहेर आले. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने गोळीबार करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी बाईकवरुन पळ काढला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. मात्र दोन आरोपींना पळून जाण्यात यश आले. पोलीस दोघांसह इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

दुपारच्या सुमारास सात दरोडेखोरांनी दुकानात दरोडा टाकला होता. तोंडावर मास्क घालून सात शस्त्रधारी दरोडेखोर हातात बंदुका घेऊन दुकानात घुसले होते. आरोपींनी काहीवेळात ४ कोटींच्या दागिन्यांची लूट केली. त्यानंतर त्यांनी पळ काढण्यासाठी बाहेरचा रस्ता धरला. पण यावेळी दरोडेखोरांच्या दुर्दैवाने पोलीस उपनिरीक्षक मेघनाद मोंडल हे तिथल्या आसपासच्या परिसरात कामासाठी गेले होते. त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकताच स्वतःजवळील सर्व्हिस रिव्हॉल्वर बाहेर काढलं आणि दरोडेखोरांवर गोळीबार केला. यामध्ये एका दरोडेखोराला गोळी लागली आणि तो खाली पडला. दरोडेखोरांनी घटनास्थळावरुन बाईकवर बसून पळ काढला. मात्र त्यावेळी चोरी केलेले २.५ कोटींचे दागिने, दोन बॅकपॅक आणि ४२ काडतूसे दुकानातच राहिली. मेघनाद मोंडल यांनी पोलीस ठाण्यांना फोन करुन या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर शेजारच्या झारखंड जिल्ह्यातली अलर्ट देण्यात आला.

दुसरीकडे काही आरोपींनी रस्त्यात एक कार हायजॅक केली आणि कोलकाता-दिल्ली महामार्गावरुन पळून जावू लागले. याची माहिती मिळताच गिरीडीहच्या पोलीस अधीक्षकांना ही माहिती मिळाली. त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. वरिष्ठांकडून सूचना मिळताच इतर अधिकाऱ्यांनी
कुलगो टोल प्लाझाला घेराव घालण्याचे निर्देश दिले. अधिकारी टोलनाक्यावर पोहोचले आणि टोलचे सर्व गेट बंद करण्यात आले. पोलीस आरोपींच्या गाडीची वाट पाहू लागले. त्यावेळी एक भरधाव कार टोलनाक्याच्या दिशेने येत होती. आरोपींनी टोलनाका ओलांडला आणि कार पुढे नेली. पोलिसांनी पुढच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि रस्ता अडवून धरण्यास सांगितले.

दोन्ही मार्ग बंद झाल्याने आरोपींनी गाडी डुमरीच्या दिशेने वळवली. दुसरीकडे गाडी डुमरीच्या दिशेने येत असल्याचे पाहून डुमरी पोलिसांनी गुन्हेगारांचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी रस्त्यात ट्रक उभा केला आणि कुलागो टोल नाक्याजवळ दोन्ही रस्ते बंद केले. त्यानंतर आरोपींनी पुन्हा पोलिसांना चकवा देत गाडी परत बगोदरकडे वळवली. आता पुन्हा गिरिडीह पोलीस गुन्हेगारांच्या गाडीच्या मागे धावू लागले. पुढे इतर पोलिसांनी आरोपींच्या गाडीला घेराव घातला. त्यानंतर आरोपी खाली उतरून पळू लागले. यातील दोन आरोपी पळून गेले आणि सुरजकुमार सिंग याला पोलिसांनी अटक केली.

Web Title: West Bengal Criminal escaping after robbing a jewelry showroom arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.