पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत निवडणूक?; केरळ, तामिळनाडूत एका टप्प्यातच मतदान शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 12:36 AM2021-02-25T00:36:00+5:302021-02-25T06:46:32+5:30
केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरीत विधानसभा निवडणुकीसाठी एका टप्प्यातच मतदान शक्य
हरिश गुप्ता
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये तीव्र संघर्ष सुरू असलेल्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची आगामी निवडणूक सात टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. तर केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात, आसाममध्ये मात्र दोन टप्प्यांत विधानसभा निवडणुका घेतल्या जाण्याची चर्चा आहे.
पश्चिम बंगालसह चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या प्रारंभी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणूक कार्यक्रमावर अखेरचा हात फिरविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक बुधवारी झाली. त्यात केंद्रीय गृहखाते व अन्य खात्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ ही चार राज्ये व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच म्हटले होते. या राज्यात निर्भय व निष्पक्ष वातावरणात विधानसभा निवडणुका पार पाडणे; हे आयोगासमोरचे मोठे आव्हान आहे.
६४०० संवेदनशील मतदान केंद्रे
पश्चिम बंगालमधील कायदा - सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत केंद्रीय निवडणूक आयोग समाधानी नाही. २०११ आणि २०१६ साली या राज्यात विधानसभा निवडणुका सहा टप्प्यांत पार पडल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या ६,४००वर पोहोचली आहे. तर एकूण मतदान केंद्रांची संख्या ३० हजारांपेक्षा अधिक आहे.
बिहारची पद्धत वापरणार प. बंगालसाठी
विविध शैक्षणिक बोर्डांच्या परीक्षाही नेमक्या याच काळात होणार आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जरा लवकर घेण्याचा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतो. ममता बॅनर्जी यांच्या सरकारची मुदत ३० मे रोजी संपत आहे. बिहारमध्ये टप्प्याटप्प्याने विधानसभा निवडणुका घेण्यात येतात. तीच पद्धत निवडणूक आयोग पश्चिम बंगालसाठी वापरणार आहे.