Woman Stuck in Hospital Lift:सरकारी रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये 4 दिवस अडकली महिला, असा वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 08:05 PM2022-01-02T20:05:56+5:302022-01-02T20:06:05+5:30
Woman Stuck in Hospital Lift: महिला चार दिवस लिफ्टमध्ये अडकून होती. यादरम्यान तिने खूप आरडाओरड केला, पण कुणालाच तिचा आवाज ऐकू आला नाही.
कोलकाता: तुम्ही अनेकदा लिफ्टमध्ये व्यक्ती अडकल्याच्या बातम्या पाहिल्या असतील. पण, कोलकातामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील नीलरतन हॉस्पिटल या सरकारी रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये एक महिला तब्बल चार दिवस लिफ्टमध्ये अडकली होती. महिला लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती रुग्णालयातील कुणालाच लागली नाही. लिफ्टमध्ये अडकल्यानंतर महिलेने खूप आरडाओरडा केला, मात्र तिचा आवाज कोणीच ऐकला नाही. खूप प्रयत्न केल्यानंतरही कुणी त्या महिलेच्या मदतीला आले नाही, अखेर महिलेने जगण्याची कोणतीही आशा सोडली होती. पण, रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती नसल्याचे सांगितले आहे.
नेमकं काय घडलं ?
मागच्या आठवड्यात सोमवारी(दि.24) 60 वर्षीय अनोयारा बीबी एनआरएस रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये डॉक्टरांना भेटण्यासाठी आल्या होत्या. डॉक्टरांची ओपीडी चौथ्या मजल्यावर असल्याने त्यांनी लिफ्टचा वापर केला. रुग्णालयात एक मोठी लिफ्ट आणि एक छोटी आहे. महिलेने छोट्या लिफ्टचा वापर केला. लिफ्ट सुरू झाली, पण दुसऱ्या मजल्यावर लिफ्ट बंद पडली. सोमवार ते शुक्रवार असे सलग चार दिवस ती लिफ्टमध्येच अडकलेली होती.
पाणी आणि चिवडा खाऊन भूक भागवली
बंगाली वृत्तपत्र गणशक्तीमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बदुदियाच्या चांदीपूर गावातील रहिवासी अनोयारा बीबीने सांगितले की, लिफ्टमध्ये अडकल्यानंतर ती खूप रडली, परंतु तिचा आवाज कोणीही ऐकला नाही. ती महिला म्हणाली, “माझ्याकडे पाण्याची बाटली आणि चिवड्याचे एक पॅकेट होते. रोज थोडासा चिवडा खाऊन आणि पाणी पिऊन दिवस काढत होते.
अशाप्रकारे लिफ्टमधून बाहेर आली
चार दिवसानंतरही महिला घरी न पोहोचल्याने घरातील सदस्य तिचा शोध घेत बाहेर पडले. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले, पण ती सापडली नाही. त्यानंतर शुक्रवारी महिलेचा एक ओळखीचा व्यक्ती रुग्णालयात पोहोचला, तेव्हा त्याला लिफ्टमधून महिलेचा आवाज आला. काही वेळातच इतर लोकांना बोलावून महिलेला तेथून सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, चार दिवस अशा अंधारात असल्याने महिला चांगलीच घाबरली होती.