बाबुल सुप्रियोंनी पुन्हा मारली बाजी, मूनमून सेन यांना पराभवाचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 06:19 PM2019-05-23T18:19:36+5:302019-05-23T18:21:46+5:30
West Bengal Lok Sabha Election Results 2019 : आसनसोल मतदारसंघात भाजपाने पुन्हा एकदा आपला झेंडा फडकावला आहे.
कोलकाता: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपाने आपला संपूर्ण फोकस पश्चिम बंगालमध्ये केंद्रित केला होता. येथील आसनसोल मतदारसंघात भाजपाने पुन्हा एकदा आपला झेंडा फडकावला आहे.
भाजपाचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसच्या मूनमून सेन यांचा 139104 मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेलला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत बाबुल सुप्रियो यांना 588057 मते पडली आहेत. तर मूनमून सेन यांना 413202 मते आणि कम्युनिस्ट पार्टीचे गौरंगा चॅटर्जी यांना 86809 मते पडली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसच्या डोला सेन यांचा जवळपास 70 हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे बाबुल सुप्रियो यांचा विजय भाजपासाठी मह्त्वपूर्ण होता, कारण भाजपाने दार्जीलिंगशिवाय पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला होता. या विजयाचे बक्षीस सुद्धा बाबुल सुप्रियो यांना मिळाले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कबिनेटमध्ये मंत्रीपद मिळाले. याशिवाय दार्जीलिंग मतदारसंघातील एस. एस. आहलुवालिया यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपा आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. 1999 साली दोन जागांवर मिळविलेल्या भाजपाला शायनिंग इंडियाच्या घोषणा देत 2004 ची निवडणूक पश्चिम बंगालमध्ये लढवली. मात्र, 2004 मध्ये एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यानंतर 2009 मध्ये भाजपा केवळ दार्जीलिंगची जागा मिळाली. तर 2014 मध्ये मोदी लाटेत दोन जागा मिळाल्या होत्या.