ममता बॅनर्जी सुरू करणार 'मां की रसोई'; ५ रूपयांत मिळणार पोटभर जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 09:21 PM2021-02-14T21:21:33+5:302021-02-14T21:23:09+5:30
यापूर्वी दिल्लीत गौतम गंभीरनं स्वत:च्या फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू केली होती 'जन रसोई'
पुढील काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना काही ना काही आश्वासनं देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच पश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी सरकार 'मां की रसोई' ही योजना सुरू करणार आहे. काही दिवसांपूर्वी गौतम गंभीर यानंदेखील दिल्लीत जन रसोईची सुरूवात केली होती. या ठिकाणी त्यानं आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गरीबांसाठी एका रुपायात जेवण उपलब्ध करून दिलं आहे.
निवडणुकांपूर्वी ममता बॅनर्जी यांचं सरकार 'मां की रसोई' हे योजना घेऊन येत आहे. या योजनेअंतर्गत गरीबांना केवळ पाच रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना डाळ, भात, एक भाजी आणि अंड देण्यात येणार आहे. सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्य सचिवालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ममता बॅनर्जी या योजनेचं उद्घाटन करतील. या योजनेअंतर्गत सध्या कोलकात्यातील १६ बोरो कार्यालयात दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली जाईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक ठिकाणी जवळपास एक हजार लोकांना दुपारचं जेवण देण्यात येणार आहे. हळूहळू कोलकात्याच्या बाहेरही या योजना सुरू करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
गौतम गंभीरनंही दिल्लीत केली होती सुरूवात
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गौतम गंभीर यांनी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दिल्लीतील गांधीनगर येथे जन रसोईची सुरूवात केली होती. याअंतर्गत लोकांना केवळ एका रूपयात भोजनाचा आस्वाद घेता येतो. कोरोना महासाथीच्या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या जन रसोईमध्ये सर्व नियमांचं पालनही केलं जातं. तसंच जेवण तयार करण्यापूर्वी संपूर्ण जागाही सॅनिटाईझ करण्यात येते. पहिल्यांदा सुरू करण्यात आलेल्या जन रसोईमध्ये २५ जानेवारी २०२१ पर्यंत एका रूपयात जवळपास ३० हजार लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. गौतम गंभीर फाऊंडेशन 'फुड फॉर ऑल' या अंतर्गत दिल्लीत एका रूपयात जेवण उपलब्ध करून देत आहे. १० फेब्रुवारी रोजी दिल्लीत आणखी एका ठिकाणी जन रसोईची सुरूवात करण्यात आली होती.