West Bengal: पश्चिम बंगाल पोलिसांची मोठी कारवाई; राज्यातील विविध भागातून 200 पेक्षा जास्त जिवंत बॉम्ब जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 06:37 PM2022-03-27T18:37:22+5:302022-03-27T18:42:48+5:30
West Bengal: पश्चिम बंगालच्या विविध भागांमधून पोलिसांना सातत्याने जिवंत बॉम्ब सापडत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 200 पेक्षा जास्त बॉम्ब निकामी केले आहेत.
कोलकाता: पश्चिम बंगालच्या (West Bengal) बीरभूममध्ये झालेल्या हिंसाचाराचा तपास सीबीआय करत आहे. यादरम्यान, गेल्या दोन दिवसांत राज्यात विविध भागात 200 हून अधिक जिवंत बॉम्ब सापडले आहेत. राज्यात सातत्याने बॉम्ब सापडत असल्याच्या तक्रारींनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर छापेमारी सुरू आहे. या क्रमात मुर्शिदाबादमधील दोन परिसरातून 41 जिवंत बॉम्ब, शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी रेजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतजमिनीतून पोलिसांना तीन ड्रम भरुन बॉम्ब सापडले. पोलिसांनी आता संपूर्ण परिसराला वेढा घातला असून बॉम्ब शोधक पथकालाही माहिती देण्यात आली आहे. रेजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ड्रममध्ये 31 जिवंत बॉम्ब सापडले आहेत. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून ते बॉम्ब निकामी केले आहेत. तपास अद्याप सुरू आहे.
तिकडे, शहरातील राणीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येही एका शेतातूनही दहा जिवंत बॉम्ब जप्त केले आहेत. हे बॉम्बही बॉम्बशोधक पथकाने निकामी केले आहेत. या बॉम्बसोबत एक शटर पाइपगन आणि चार काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. शस्त्रास्त्र कायद्याप्रकरणी पोलिसांनी प्रताप मंडल नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
बीरभूममध्ये 170 बॉम्ब सापडले
एका दिवसापूर्वीच पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये 40 देशी बनावटीचे बॉम्ब सापडले होत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून बीरभूममधून एकूण 170 देशी बनावटीचे बॉम्ब सापडले आहेत. रामपूरहाटच्या बोगतुई गावाला लागून असलेल्या मारग्राममधील एका बांधकामाधीन इमारतीतून पोलिसांनी क्रूड बॉम्बने भरलेल्या आणखी 4 बादल्या जप्त केल्या, ज्यात सुमारे 40 बॉम्ब होते. शुक्रवारी मरग्राममधूनच 5 बादल्या क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले होते.
टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार
बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता. येथे अनेक घरांना आग लागली. या आगीत 2 मुलांसह 8 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 3 महिलांचाही समावेश होता. आता याप्रकरणी सीबीआय कारवाई करत आहे. अटक करण्यात आलेल्या 21 आरोपींविरुद्ध सीबीआयने दंगलीशी संबंधित कलमे लावली आहेत.