ममता बॅनर्जींना धक्का; कोलकाता घटनेच्या निषेधार्थ खासदाराचा राजीनामा, पक्षावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 01:55 PM2024-09-08T13:55:44+5:302024-09-08T13:56:06+5:30
West Bengal Mamata Banerjee TMC : कोलकाता बलात्कार अन् हत्या प्रकरणात ममता बॅनर्जींना कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप खासदाराने केला आहे.
West Bengal Mamata Banerjee TMC : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आरजी कार मेडिकल महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये घडलेल्या पाशवी घटनेच्या निषेधार्थ पक्षाचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार (Jawhar Sircar) यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असेही पत्रात म्हटले आहे.
जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, आरजी कार हॉस्पिटलमधील घडलेल्या घटनेमुळे मला खुप वेदना होत आहेत. त्या क्रूर घटनेबाबत मुख्यमंत्री तातडीने काही कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा होती. त्या आपल्या जुन्या शैलीत कारवाई करतील असे वाटले होते, पण त्यांनी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. कारवाई करण्यासही उशीर केला.
TMC Rajya Sabha MP Jawhar Sircar writes to West Bengal CM Mamata Banerjee, offers his resignation from the post of MP.
— ANI (@ANI) September 8, 2024
"I have suffered patiently for a month since the terrible incident at RG Kar Hospital, & was hoping for your direct intervention with the agitating junior… pic.twitter.com/vvgHt4066H
जवाहर सरकार पुढे म्हणतात, या प्रकरणात राज्य सरकार जी काही पावले उचलत आहे, ती पुरेशी नाहीत. त्या घटनेनंतर सरकारने भ्रष्ट डॉक्टरांवर आणि दोषींवर ताबडतोब कारवाई केली असती, तर राज्यातील परिस्थिती फार पूर्वीच सामान्य झाली असती. राज्यात लवकरच शांतता प्रस्थापित व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा करतो. या पत्रात सरकार यांनी पक्षातील भ्रष्टाचाराचा मुद्दाही उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, पंचायत आणि नगरपालिकांमधील स्थानिक पातळीवरील पक्षाच्या नेत्यांनी प्रचंड संपत्ती जमा केली आहे, त्यामुळे बंगालच्या जनतेचे नुकसान झाले आहे.
आंदोलनाचा मुख्य प्रवाह अराजकीय आहे, असे माझे मत आहे आणि त्याला राजकीय म्हणत संघर्ष निर्माण करणे योग्य नाही. राज्यातील आंदोलक तरुण-तरणींना राजकारण नको, न्याय हवा आहे. हे आंदोलन जितके महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसाठी आहे तितकेच राज्य सरकारचे आहे. त्यासाठी सरकारने तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे, अन्यथा जातीयवादी शक्ती या राज्याचा ताबा घेतील. मला बंगालचे प्रश्न खासदार म्हणून मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो, पण आता मला खासदार म्हणून अजिबात राहायचे नाही, असे ते आपल्या पत्रात म्हणाले.