बंगाल : ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मंत्र्यावर हल्ला हा कट, रेल्वे जबाबदारी झटकू शकत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 02:04 PM2021-02-18T14:04:18+5:302021-02-18T14:09:03+5:30
West Bengal : ममता बॅनर्जींनी साधला रेल्वेवर निशाणा, म्हणाल्या जबाबदारी झटकता येणार नाही
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडतील. परंतु त्यापूर्वी सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील मंत्री झाकिर हुसेन यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आज ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
हा हल्ला म्हणजे कट असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसंच यावेळी त्यांनी रेल्वे मंत्रालयावरही आरोप केले. तसंच रेल्वे मंत्रालय आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असंही त्या म्हणाल्या. जर रेल्वे स्थानकावर कोणावरही हल्ला झाला तर त्याच्यासाठी रेल्वे जबाबदार आहे. कारण याठिकाणी राज्याच्या पोलिसांकडे सुरक्षेचे अधिकार नाहीत, असंही त्या म्हणाल्या. "गेल्या काही महिन्यांपासून काही लोकं झाकिर हुसेन यांना आपल्या पक्षात येण्यासाठी दबाव टाकत आहेत. मी त्यांच्या नावाचा खुलासा करू इच्छित नाही," असंही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.
West Bengal: Chief Minister Mamata Banerjee arrives at the hospital in Kolkata to meet state minister Jakir Hossain who got injured after unidentified people hurled a bomb at him in Murshidabad yesterday. pic.twitter.com/MbrUlmQxLv
— ANI (@ANI) February 18, 2021
मंत्र्यावर बॉम्बहल्ला
ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री झाकीर हुसेन यांच्यावर मुर्शिदाबाद जिल्ह्यात पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. त्यानंतर हुसेन यांना तातडीने जंगीपूरमधील उपविभागीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मंत्री झाकीर हुसेन यांचा ताफा निमटिटा रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. दरम्यान, रुग्णालयानं झाकीर हुसेन यांची प्रकृती स्थिर असल्याचंही म्हटलं होतं. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेले मंत्री दिसत आहेत. तसंच या घटनेनंतर मंत्र्यांना कशाप्रकारे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले हेदेखील दिसत आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील मंत्री झाकीर हुसेन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी निषेध केला आहे. याबबत केलेल्या ट्वीटमध्ये विजयवर्गीय म्हणाले की, "झाकीर हुसेन यांच्यावर निमटिटा रेल्वेस्टेशनवर क्रूड बॉम्बच्या माध्यमातून झालेल्या हल्ल्याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. त्यांच्या प्रकृती लवकरात लवकर उत्तम व्हावी अशी प्रार्थना करतो," असंही ते म्हणाले.