Mamata Banerjee: “ममता बॅनर्जी म्हणजे साक्षात देवीचे रुप, प. बंगालला सर्वश्रेष्ठ करण्यासाठी मोठा त्याग केला”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 09:17 AM2023-03-27T09:17:01+5:302023-03-27T09:17:49+5:30
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमधील एका मंत्र्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना थेट देवाशी केली आहे.
Mamata Banerjee: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यापासून काँग्रेस देशभरात चांगलीच आक्रमक झाली आहे. देशभरातील विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मात्र, यातच अनेकदा कार्यकर्ते, नेतेमंडळी, मंत्र्यांकडून पंतप्रधान मोदी, राहुल गांधी किंवा आपल्या सर्वोच्च नेत्याची तुलना थेट भगवंताशी केलेली पाहायला मिळते. पश्चिम बंगालमध्येही राज्यातील एका मंत्र्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना देवाशी केली आहे.
पश्चिम बंगालमधील मंत्री सोवनदेब चटोपाध्याय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना भगवंताशी केली आहे. एखाद्या वेळेस मी चोर होऊ शकतो. मात्र, ममता बॅनर्जी चुकीच्या असू शकत नाहीत. आपल्या मतदारसंघात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोवनदेब चटोपाध्याय म्हणाले की, मंदिराचा पुजारीही चोर निघू शकतो, पण देव कधीच चोर होऊ शकत नाही.
ममता बॅनर्जी म्हणजे साक्षात देवीचे रुप, प. बंगालला सर्वश्रेष्ठ करण्यासाठी मोठा त्याग केला
सोवनदेब चटोपाध्याय यांनी पुढे बोलताना सांगितले की, ममता बॅनर्जी म्हणजे साक्षात देवीचे स्वरुप आहेत. पश्चिम बंगालला सर्वश्रेष्ठ करण्यासाठी त्यांनी मोठा त्याग केला आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते ममता बॅनर्जी यांना खूप मानतात. पक्षात कुणीही चोर असेल तरी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, अशी ग्वाहीदेखील चटोपाध्याय यांनी यावेळी बोलताना दिली. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे आमदार तापस रॉय यांनी पश्चिम बंगाल राज्यातील घोटाळ्यांसाठी अधिकाऱ्यांना दोषी धरले आहे. राहुल गांधी यांच्याविरोधातील कारवाईवर बोलताना रॉय म्हणाले की, राहुल गांधी संसदेत आहेत की नाही हे महत्त्वाचे नाही. संसदेत लोकशाही टिकून राहते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांची तुलना देवाशी केल्यासंदर्भात भाजपने तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे. प्रियंका टिबरेवाल यांनी म्हटले की, तृणमूल नेत्यांनी यापूर्वीही अशा प्रकारची विधाने केली आहेत. ते ममता बॅनर्जींची तुलना देवीशी करतात. ही टीएमसीची संस्कृती बनली आहे. पण आता टीएमसीचे लोक जे घोटाळे करत आहेत ते संपूर्ण बंगाल बघत आहे, अशी टीका त्यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"