'माझ्या अंगाला हात लावू नकोस, मी पुरुष आहे', तृणमूलने उडवली शुभेंदू अधिकारींची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 08:05 PM2022-09-13T20:05:06+5:302022-09-13T20:06:10+5:30
भाजपच्या नबान्न अभियानादरम्यान भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचा महिला पोलिसाशी झालेला संवाद तृणमूलने शेअर केला आहे.
कोलकाता: आज पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेसचा संघर्ष शिगेला पोहोचला. ममता सरकारविरोधात भाजपने नबन्ना अभियान सुरू केले, यादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. यातच आता तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले नेते शुभेंदू अधिकारी यांच्या एका वक्तव्याची तृणमूलकडून खिल्ली उडवली जात आहे.
आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर शुभेंदू अधिकारी यांनी केलेल्या वक्तव्याची टीएमसीकडून खिल्ली उडवली जात आहे. शुभेंदू यांचा एक व्हिडिओ तृणमूलने ट्विट केला असून, व्हिडीओमध्ये शुभेंदू एका महिला पोलीस अधिकाऱ्याला "माझ्या शरीराला हात लावू नकोस, तू एक महिला आहेस आणि मी पुरुष आहे' असे सांगताना ऐकू येत आहे.
.@BJP4India's 56-inch chest model BUSTED!
— All India Trinamool Congress (@AITCofficial) September 13, 2022
Proclamation of the day: "Don’t touch my body. I am male!" pic.twitter.com/hHiWr0yuHE
मिळालेल्या माहितीनुसार, शुभेंदू अधिकारी हावडा येथील संत्रागांची येथून नबन्नाच्या दिशेने जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना घेराव घालून पुढे जाण्यापासून रोखले. यावेळी त्यांचा पोलिसांशी वाद झाला, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी शुभेंदू यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला हात नको लावू म्हटले. यावरुन आता त्यांना ट्रोल केले जात आहे.
शुभेंदू अधिकारींची पोलिसांवर टीका
मंगळवारी अटक करताना कोलकाता पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे महिला पोलिसांचा वापर केला, त्यावर शुभेंदू अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लालबाजारमधील पोलिस कोठडीतून हुगळीचे खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्या फेसबुक प्रोफाइलवरून त्यांनी हे लाइव्ह केले. यावेळी त्यांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला.