जळत्या चितेतून पडू लागल्या 500-500 च्या नोटा; उशीतून रहस्य उलगडलं, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 01:17 PM2023-11-01T13:17:53+5:302023-11-01T13:25:35+5:30
एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चितेतून पैसे पडू लागल्याने गोंधळ उडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगना जिल्ह्यात एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चितेतून पैसे पडू लागल्याने गोंधळ उडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकांनी लगेचच आग विझवली आणि नंतर कुटुंबीयांनी पैसे बाहेर काढले. मृत व्यक्ती व्हॅन चालक होता. ड्रायव्हर आपले वाचवलेले पैसे उशीत ठेवायचा. याच दरम्यान, त्याचा अचानक मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मृतदेहासह उशी ठेवली. यावेळी उशी पेटू लागल्याने त्यातून अर्धे जळालेले रुपये पडू लागले. यानंतर कुटुंबीयांनी घाईघाईने चितेतून उशी काढून नोटा जळण्यापासून वाचवल्या.
भारत-बांगलादेश सीमेजवळील बशीरहाटच्या घोजाडांगा भागातील रहिवासी निमाई सरदार याचा मृत्यू झाला. त्याला मुलं नाहीत. त्यामुळे भाचा पंचानन सरदार यााला अंत्यसंस्कार करण्यासाठी बोलावण्यात आलं. भाच्याने निमाई यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार करताना उशी चितेवर ठेवली होती. कुटुंबातील सदस्यांना 500 रुपयांच्या अनेक नोटा दिसल्या.
लोकांना उशीच्या आतमध्य़े एक पिशवी दिसते. आगीतून पिशवी बाहेर काढली. त्यातून 500 रुपयांच्या नोटांचे बंडल बाहेर आले. ते पैसे कोणत्याही बँकेत अदलाबदल होऊ शकत नव्हते. नंतर निमाईचा भाचा पंचानन याला हाबरा येथे एक व्यक्ती सापडली. तो व्यक्ती जळालेले पैसे बदलून देतो असं समजलं. त्यानंतर पंचानन पैसे घेऊन हबरा येथे आला.
पंचाननने खोकन घोष नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला. जळालेल्या 16 हजारांच्या नोटांंच्या बदल्यात खोकनने पंचाननला 7 हजार 150 रुपये दिले. भाच्याने सांगितलं की तो व्हॅन चालवायचा, पण त्याने इतके पैसे वाचवले हे आमच्यापैकी कोणालाच माहीत नव्हतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.