७ हत्या, मतपत्रिका पळवल्या, जाळपोळ, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसेचा आगडोंब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 10:14 AM2023-07-08T10:14:37+5:302023-07-08T10:15:57+5:30
West Bengal Panchayat Elections 2023: पश्चिम बंगालमधील मतदानादरम्यान, आतापर्यंत ७ जणांची हत्या झाली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तृणमूलच्या ५ तर भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा समावेश आहे.
पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मतदान आज होत आहे. ८ जून रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला असून, यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुरक्षेसाठी तब्बल १ लाख ३५ हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, आज मतदानादिवशीची मोठ्या प्रमाणावर हिंसेचा आगडोंब उसळला असून, त्यात काही कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर काही ठिकाणी मतपत्रिका पळवण्याचे प्रकार घडले. तर काही ठिकाणी मतपेट्या जाळण्यात आल्या.
पश्चिम बंगालनिवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २२ जिल्ह्यातील ६३ हजार २२९ ग्रामपंचायतीच्या जागा, पंचायत समितीच्या ९ हजार ७३० जागा आणि जिल्हा परिषदेच्या ९२८ जागांवर हे मतदान होत आहे. या मतदानामधून सुमारे ५.७ कोटी मतदार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. या निवडणुकीचा निकाल ११ जुलै रोजी जाहीर होणार आहे. २०२४ रोजी होणाऱ्या पुढील लोकसभा निवडणुकीची ही निवडणूक म्हणजे पूर्व परीक्षा म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान आज होत असलेल्या मतदानादरम्यान, २४ परगणा जिल्ह्यात रस्त्याच्या शेजारी टीएमसीचा बॅनर घेऊन बसलेल्या कार्यकर्त्याची पोलिसांनी पिटाई केली. तर पश्चिम बंगालमधील सीताई येथे एका मतदान केंद्रावर मोडतोड करण्यात आलीय तिथे मतपत्रिका पळवून त्या पेटवून देण्यात आल्या. या घटनेनंतर खूप वाद झाला.
कूचबिहारमधील फोलिमारी येथे हिंसाचार भडकला असून, तिथे भाजपाच्या पोलिंग एजंटची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी हल्लेखोरांनी भाजपाचे पोलिंग एजंट माधव विश्वास याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका ठिकाणी बॉम्बफेक करण्यात आली. त्यात सीपीआयएम उमेदवार अनिता अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम बंगालमधील मतदानादरम्यान, आतापर्यंत ७ जणांची हत्या झाली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तृणमूलच्या ५ तर भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा समावेश आहे.
मालदा येथे बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचे वृत्त आहे. भाजपाने त्यावरून तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसकडून आपल्या कार्यकर्त्यांनमा लक्ष्य करण्यात येक आहे, असा आरोप भाजपाने केला आहे.