अयोध्या वारी! १४०० किमी मार्ग, ९० दिवसांचा वेळ; हनुमंतांची साथ अन् श्रीराम दर्शनाची आस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 03:50 PM2023-12-05T15:50:54+5:302023-12-05T15:51:28+5:30
Ram Mandir Ayodhya Wari: प. बंगालमधील अराजकता दूर व्हावी. देशात रामराज्याची पुन्हा स्थापना व्हावी, यासाठी एक व्यक्ती बहरामपूर येथून अयोध्येला पायी निघाली आहे.
Ram Mandir Ayodhya Wari: अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. देशभरातील ४ हजारांहून अधिक संत-महंतांना निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या सोहळ्याला देशातील अनेक नेते, मंत्री, मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एक व्यक्ती अयोध्या वारीसाठी निघाली आहे.
प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची आस रामभक्तांना लागली आहे. यातच आता पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथून अयोध्येला जाण्यासाठी एक व्यक्ती पायी निघाला आहे. ही पायी वारी सोपी नाही. सुमारे १४०० किमीचा रस्ता आहे. ९० दिवसांचा वेळ या व्यक्तीला लागणार असल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम बंगालमधील अराजकता दूर व्हावी आणि देशभरात रामराज्याची पुनर्स्थापना व्हावी, अशी इच्छा बाळगून या व्यक्तीने आपली अयोध्या वारी सुरू केली आहे.
कोण आहे ती व्यक्ती? काय आहेत भावना?
विश्वंभर कनिका असे या व्यक्तीचे नाव आहे. विश्वंभर ४ डिसेंबर रोजी सकाळी मुर्शिदाबादच्या बहरामपूर येथून पायी चालत अयोध्येला निघाले आहेत. हातीनगर भागातून पायी निघालेल्या विश्वंभर यांना अयोध्येपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ३ महिने लागतील. यावेळी सुमारे १४०० किमी अंतर ते कापणार आहे. पश्चिम बंगालमध्ये पसरलेल्या अराजकतेच्या विरोधात आणि देशभरात ‘रामराज्य’ पुन्हा स्थापन व्हावे, या मागणीसाठी विश्वंभर यांनी अयोध्या वारी आरंभलेली आहे. श्रीरामाच्या कृपेने मी हा लांबचा प्रवास नक्की पूर्ण करेन, असा विश्वास व्यक्त करत, मी माझ्या घरी स्थापित केलेली हनुमानजीची मूर्ती सोबत घेऊन जात आहे, अशी माहिती विश्वंभर यांनी दिली. अयोध्या वारीसाठी निघण्यापूर्वी विश्वंभरचे वडील, आई आणि पत्नी यांनी त्यांचा भावनिक निरोप घेतला. परिसरातील लोकही मोठ्या संख्येने जमले होते.
दरम्यान, राज्यभर अराजकता पसरली आहे. यातून सुटका व्हावी, अशी आमची मागणी आहे. यासाठीच माझ्यासोबत असलेल्या हनुमानाची भेट अयोध्येत प्रभू श्रीरामांशी करून देणार आहे. कुटुंबाचा निरोप घेऊन प्रवासाला सुरुवात केली. मी देशातील आणि राज्यातील जनतेच्या समृद्धीसाठी कामना करतो. या प्रकरणाची माहिती मिळताच बेरहामपूरच्या भाजप आमदार कांचन मोइत्रा विश्वंभर यांच्या घरी पोहोचल्या. राज्यातील आणि संपूर्ण देशाच्या लोकांच्या कल्याणासाठी अयोध्येला पायी जाणाऱ्या एवढ्या मोठ्या प्रवासाला भाजप पूर्ण पाठिंबा देईल. आमचा पक्ष जगाच्या लोककल्याणकारी मानसिकतेचे कौतुक करतो, अशी प्रतिक्रिया मोइत्रा यांनी दिली. सध्या ही अयोध्या यात्रा परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.