पश्चिम बंगालमध्ये ७९.७० टक्के मतदान
By admin | Published: April 18, 2016 02:42 AM2016-04-18T02:42:15+5:302016-04-18T02:42:15+5:30
प. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात हिंसाचाराच्या तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले असून ७९.७० टक्के एवढ्या भरघोस मतदानाची नोंद झाली आहे. रविवारी दक्षिण
कोलकाता : प. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात हिंसाचाराच्या तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले असून ७९.७० टक्के एवढ्या भरघोस मतदानाची नोंद झाली आहे. रविवारी दक्षिण बंगालच्या एका तसेच उत्तर बंगालच्या सहा जिल्ह्णांतील ५६ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडले.
अलीपूरदुआर, जलपाईगुडी, दार्जिलिंग, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर, माल्दा या उत्तर बंगालमधील सहा जिल्ह्णांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत ७० टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली होती. डाव्या दहशतवादाची झळ पोहोचलेल्या बीरभूमच्या सात मतदारसंघांमध्ये संध्याकाळी ४ वाजता मतदान संपले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी रविवारी कोलकात्यात बनावट मतदान आणि मतदान केंद्रे बळकावण्यात आल्याचा आरोप केला. माल्दा येथे माकप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षात दोघे जखमी झाले. त्यात तृणमूलच्या पोलिंग एजंटचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
पक्षचिन्ह लावल्याने वाद
निवडणूक आयोगाने २४ तास निगराणी ठेवल्यामुळे वादग्रस्त ठरलेले तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रता मंडल यांनी शर्टला पक्षाचे निवडणूक चिन्ह लावून मतदान केल्यामुळे नवा वाद ओढवला आहे. त्याबद्दल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.