आता केवळ 71 दिवस! ममतांची खुर्ची वाचविण्यासाठी TMCनं पुन्हा ठोठावला निवडणूक आयोगाचा दरवाजा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 07:47 PM2021-08-26T19:47:04+5:302021-08-26T19:47:18+5:30
ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने सलग तिसऱ्यांदा बंगालमध्ये पूर्ण बहुमत मिळविले आहे. मात्र, त्या स्वतः नंदीग्राम सीटवर भाजप नेते आणि त्यांचे माजी सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत.
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी खुर्चीची चिंता अद्यापही कायम आहे. ममता पुढील 71 दिवसांत आमदार झाल्या नाही, तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. यामुळे तृणमूल काँग्रेसने आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जाऊन राज्यात लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत विधानसभा सदस्य होणे आवश्यक आहे.
टीएमसी नेत्या सौगत रॉय यांच्या नेतृत्वाखाली टीएमसीच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन राज्यात लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. यापूर्वीही यासंदर्भात दोन वेळा टीएमसीने अर्ज केला आहे. एवढेच नाही, तर खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही, राज्यात लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सौगात रॉय म्हणाले, की "पश्चिम बंगालमधील सातही जागांसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्यात यावी, असे निवेदन आम्ही निवडणूक आयोगाला दिले आहे."
ममता बॅनर्जींना धक्का, आता सीबीआय करणार 'या' प्रकरणाचा तपास
ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने सलग तिसऱ्यांदा बंगालमध्ये पूर्ण बहुमत मिळविले आहे. मात्र, त्या स्वतः नंदीग्राम सीटवर भाजप नेते आणि त्यांचे माजी सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या. नियमा प्रमाणे, जी व्यक्ती विधानसभा किंवा विधान परिषदेची (ज्या राज्यांत विधान परिषद आहे अशा राज्यांत) सदस्य नाही, तिला मुख्यमंत्री अथवा मंत्री बनविले जाऊ शकते. मात्र, अशा व्यक्तीला सहा महिन्यांच्या आत निवडून येणे आवश्यक आहे.
या जागांवर होणार आहे पोटनिवडणूक -
पश्चिम बंगालमधील भवानीपूर, दिनहाटा, सुती, संतीपूर, समशेरगंज, खर्दाह आणि जंगीपूर विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. मृत्यू अथवा राजीनाम्यांमुळे या जागा रिक्त झाल्या आहेत.