West Bengal : अंतर्गत सर्वेक्षणात TMCचं नुकसान, भाजपला मिळतायत एवढ्या जागा
By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 4, 2021 06:57 PM2021-01-04T18:57:21+5:302021-01-04T18:59:53+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी 190 च्या जवळपास जागा जिंकू शकते, असे पक्षाच्या अतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. 016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 211 जागांवर विजय मिळवला होता.
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीच सत्तारूढ तृणमूल काँग्रेस आणि राज्यात आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात करत असलेल्या भाजपने आपापल्या विजयाचा दावा केला आहे. यातच आता तृणमूल काँग्रेसने बंगालच्या जनतेची नस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी 190 च्या जवळपास जागा जिंकू शकते, असे पक्षाच्या अतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 211 जागांवर विजय मिळवला होता.
काय सांगते टीएमसीचे अतर्गत सर्वेक्षण -
टीएमसीच्या अतर्गत सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजपला 98 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला केवळ 6 जागांवरच समाधान मानावे लागणार असल्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणानुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 51 टक्क्यांपेक्षा थोडी अधिक मते मिळू शकतात.
भाजप या सर्वेक्षणाला गांभीर्याने घेताना दिसत नाही -
टीएमसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळच्या निवडणुकीत दार्जिलिंग, बीरभूम, मालदा, मुर्शिदाबाद, कूचबिहार, पश्चिम बर्धमान, नदिया आणि कोलकाता जिल्ह्यात टीएमसीच्या मतांमध्ये वाढ होऊ शकते. मात्र, भाजप या सर्वेक्षणाला गांभीर्याने घेताना दिसत नाही. टीएमसी नेते आणि राज्यसभा खासदार शांतनू सेन यांनी दावा केला आहे, की बंगालच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील लोक सरकारच्या कामावर खूश आहेत.
बंगालमध्ये 148 मॅजिकल फिगर -
गत 2019च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता, भाजप विधानसभेच्या दृष्टीने 121 जागांवर पुढे होती. बंगालमध्ये 148 ही मॅजिकल फिगर आहे. भाजपच्या मोठ्या नेत्यांचे म्हणणे आहे, बंगालमधील वातावरण पाहता राज्यात भाजपच सरकार स्थापन करेल. याशिवाय टीएमसीचे छोटे-मोठे नेते सातत्याने भाजपमध्ये सामील होत आहेत. यामुळे भाजपचे बंगालमधील स्थान अधिक बळकट होत आहे.
"भाजप पश्चिम बंगाल विधानसभेत 155 ते 160 जागा जिंकेल" -
भाजपच्या अनेक नेत्यांनी अंदाज व्यक्त केला आहे, की या वेळी भाजप पश्चिम बंगाल विधानसभेत 155 ते 160 जागा जिंकेल. यावेळी भाजपने बंगालची पाच झोनमध्ये विभागणी केली आहे. यात, उत्तर बंगाल झोनमध्ये 54 जागा असून पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप येथे 30 ते 35 जागा जिंकू शकतो.