West Bengal: ममतांचा मोठा डाव! शुत्रघ्न सिन्हांना लोकसभा तर बाबुल सुप्रियोंना विधानसभेची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2022 01:13 PM2022-03-13T13:13:28+5:302022-03-13T13:15:00+5:30
TMC Candidate: पुढच्या महिन्यात 12 एप्रिलला पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा आणि बालीगंज विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
कोलकाता: तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्रसिद्ध सिनेस्टार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांना आसनसोल लोकसभा मतदारसंघातून आणि बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांना बल्लीगंगे विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसची उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी बाबुल सुप्रियो यांनी आसनसोल या लोकसभा मतदारसंघातून राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
12 एप्रिलला पोटनिवडणूक
शत्रुघ्न सिन्हा हे अनेक दिवसांपासून भाजपचे विरोधक असून, अनेक दिवसांपासून भाजपच्या धोरणांवर टीका करत आहेत. आसनसोल संसदीय जागा आणि बंगालच्या बालीगंगे विधानसभा जागेसाठी 12 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे, तर निकाल 16 एप्रिलला जाहीर होणार आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाने शनिवारी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली.
Sri Babul Supriyo, former union minister and noted singer, will be our candidate in Vidhansabha by- election from Ballygunge. Jai Hind, Jai Bangla, Jai Ma- Mati- Manush!(2/2)
— Mamata Banerjee (@MamataOfficial) March 13, 2022
ममता बॅनर्जींची घोषणा
रविवारी ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले की, "अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोलमधून लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आमचे उमेदवार असतील. तसेच, माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध गायक बाबुल सुप्रियो हे बल्लीगंगे विधानसभा पोटनिवडणुकीत आमचे उमेदवार असतील. जय हिंद, जय बांगला, जय माँ-माटी- मानुष."
बाबुल सुप्रियोंचा दोनवेळा विजय
बाबुल सुप्रियो 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वेळा आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. 2019 मध्ये बाबुल सुप्रियो यांनी TMC उमेदवार मून मून सेन यांचा 1,97,637 मतांनी पराभव केला. गेल्या वर्षी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. बाबुल सुप्रियो यांनीही केंद्रीय मंत्री आणि खासदारकीचा राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.