"हिंमत असेल तर अटक करा…!;" घणाघाती आरोप करत ममतांचं भाजपला खुलं आव्हान
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 25, 2020 07:47 PM2020-11-25T19:47:29+5:302020-11-25T19:49:06+5:30
मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी यावेळी भाजप म्हणजे खोटारडेपणाचा कचरा आणि देशाला लाभलेला सर्वात मोठा अभिशाप असल्याचे म्हटले आहे.
कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये 2021मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. मात्र, भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यात आताच शाब्दिक द्वंद्व सुरू झाले आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी बांकुडा येथे रॅली केली. यावेळी त्यांनी भाजपवर घोडेबाजार करत असल्याचा आरोप केला. एवढेच नाही, तर भाजपला आव्हान देत, हिम्मत असेल, तर मला अटक करा. तृणमूल काँग्रेस कारागृहातूनही निवडणूक जिंकेल. असे ममतांनी म्हटले आहे.
भाजप म्हणजे देशाला लाभलेला सर्वात मोठा अभिशाप -
मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी यावेळी भाजप म्हणजे खोटारडेपणाचा कचरा आणि देशाला लाभलेला सर्वात मोठा अभिशाप असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर पक्ष बदलण्यासाठी भाजप तृणमूल काँग्रेसच्या आमदारांना पैशांचे अमिष दाखवत आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करावी. मी कारागृहातूनही तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देऊ शकते, असेही ममता म्हणाल्या. बंगाल विधानसभेत 294 जागा आहेत. येथे पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होणार आहे.
भाजप राजकीय पक्ष नाही, खोटारडेपणाचा कचरा -
ममता बॅनर्जी यांनी यावेळी भाजपवर आरोप केला, की काही लोक सट्टेबाजांप्रमाणे काम करत आहेत. त्यांना वाटते, की भाजप सत्तेवर येईल. भाजप राजकीय पक्ष नाही. तर खोटारडेपणाचा कचरा आहे. जेव्ह-जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा-तेव्हा ते, टीएमसी नेत्यांना घाबरवण्यासाठी नारद आणि शारदा घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करतात. मात्र, मी भाजप आणि त्यांच्या संस्थांना घाबरत नाही, असेही ममता म्हणाल्या.
पुन्हा आम्हीच मोठ्या बहुमताने सरकार स्थापन करू -
"काही लोक भ्रमात आहेत, की भाजप सत्तेत येईल. त्यामुळे ते चान्स घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मी त्यांना स्पष्टपणे सागू इच्छिते, की भजप सत्तेत येणाचा ना चान्स आहे, ना ते ‘बाय चान्स’ सरकार बनवू शकता. पुन्हा आम्हीच मोठ्या बहुमताने सरकार स्थापन करू," असेही ममता म्हणाल्या. पश्चिम बंगालमध्ये 2011पासूनच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीचे सरकार आहे.