डिलीट केलेल्या फेसबुक पेजमध्ये काय? संसदेतील घुसखोरांचा तपशील मागविला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 07:06 AM2023-12-19T07:06:51+5:302023-12-19T07:07:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : संसद सुरक्षा भंग प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींची सोशल मीडिया खाती आणि नंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संसद सुरक्षा भंग प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींची सोशल मीडिया खाती आणि नंतर हटवलेले फेसबुक पेज ‘भगतसिंग फॅन क्लब’ याचा तपशील दिल्ली पोलिसांनी ‘मेटा’कडून मागविला आहे, असे सूत्रांनी सांगितले. याच पेजवरून सर्व आरोपी संपर्कात आले होते.
१३ डिसेंबरच्या घटनेसाठी कोणाकडून पैसे मिळाले आहेत का? हे पाहण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या विविध पथकांनी रविवारी आरोपींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्यांच्या बँक खात्यांचा तपशील गोळा केला. नीलम देवी आणि सागर शर्मा यांची बँक पासबुक अनुक्रमे हरयाणाच्या जिंद आणि उत्तर प्रदेशातील लखनौ येथील त्यांच्या घरातून जप्त करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर पथकाने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या ‘मेटा’ला आरोपींच्या सोशल मीडिया खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी पत्र लिहिले आहे आणि फेसबुक पेज ‘भगतसिंग फॅन क्लब’ जसे की सदस्यांची संख्या इत्यादी तपशील मागितले आहेत.
जाळलेल्या मोबाइलचे भाग फॉरेन्सिककडे...
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संसदेच्या सुरक्षा भंगाच्या कटाचा मास्टरमाईंड ललित झा घटनेनंतर राजस्थानच्या नागौरमध्ये लपून बसला होता. तेथेच त्याने आपला मोबाइल फोन फेकून दिला आणि इतर आरोपींचे जाळून टाकले. झा याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नंतर तुटलेल्या आणि जाळलेल्या मोबाइल फोनचे तुकडे जप्त केले. त्यातून डेटा पुन्हा मिळवता येईल का? हे पाहण्यासाठी हे भाग फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.