कुमारस्वामींच्या शपथविधीचा नेमका खर्च किती? ताजच्या वेबसाईटवर भलतेच दर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 04:26 PM2018-08-11T16:26:36+5:302018-08-11T16:30:25+5:30
बिले कित्येक पटींनी वाढवल्याचे उघड; कुमारस्वामींचा बोलण्यास नकार
बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या शपथविधीला तब्बल 42 लाखांचा खर्च झाल्याचे समोर आले होते. यावरून जेडीएसवर टीकाही झाली होती. मात्र, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खर्चावरची लाखोंची बिले पाहून ती मुद्दामहून वाढवली गेली नाहीत ना, याबाबत शंकेस वाव मिळत आहे.
केजरीवाल यांनी एका रात्रीत 1.85 लाख तर नायडू यांनी 9 लाख रुपये खर्च झाल्याचे वृत्त आले होते. मात्र, हे दोघेही थांबलेल्या ताजच्या वेस्ट एंड हॉटेलचे दर पाहता एवढे पैसे त्यांनी कुठे खर्च केले याचा थांगपत्ताच लागत नाही. ताजच्या वेबसाइटवर प्रिमियम श्रेणीतील स्वीटचा दर हा 35 हजार रुपये आहे. तर नायडू यांच्या स्वीटचे भाडे तब्बल 2 लाख दाखविण्यात आले आहे. म्हणजेच जवळपास सहा पट अधिक दर लावण्यात आला आहे. तसेच बिलानुसार नायडू यांनी 23 मेच्या रात्री 2.13 लाखांचे जेवण आणि ज्युस पिल्याचे दाखिवण्यात आले आहे. मात्र, काही तासांतच हे बिल 8.3 लाखांवर पोहोचले.
केजरीवाल आणि नायडू या दोन्ही नेत्यांना या टीकेला सामोरे जावे लागल्याने त्यांनी कर्नाटक सरकारकडे खुलासा मागितला आहे. केजरीवाल यांच्या राहण्याचे आणि जेवणाचे बिल तर 1.85 लाख रुपये दाखविण्यात आले आहे. या प्रकरणी कुमारस्वामी यांनी बोलण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे या नेत्यांनी चौकशीची मागणी केल्याचे समजते. मात्र, मुख्य सचिव टीएम विजय भास्कर यांनी आपल्याकडे कोणीही चौकशीची मागणी केली नसल्याचे सांगितले.
कुमारस्वामी यांच्या शपथविधी केवळ 7 मिनिटांचा होता. मात्र, त्यावर कर्नाटक सरकारने 42 लाख रुपये खर्च केल्याचे वृत्त गुरुवारी पसरले होते. यावरून जेडीएसने हे बिल भरण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी केली होती.