15 कोटी 'गृहमंत्र्यांचा' व्यवसाय कोणता? पतीच्या कार्यालयाइतकेच पत्नीचे घरकामही बहुमोलाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 07:10 AM2021-01-07T07:10:21+5:302021-01-07T07:10:39+5:30
Supreme Court: २०१४ साली दिल्लीत एका दाम्पत्याच्या स्कूटरला कारने दिलेल्या धडकेत ते दोघे ठार झाले होते. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर त्यांच्या वारसदारांना भरपाई वाढवून देण्याचा आदेश न्यायालयाने विमा कंपनीला दिला. त्या खटल्यात न्यायालयाने अशी भूमिका घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पती कार्यालयात जाऊन करीत असलेल्या कामाइतकेच त्याची पत्नी घरामध्ये करीत असलेले काम बहुमोलाचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीवेळी व्यक्त केले. २०१४ साली दिल्लीत एका दाम्पत्याच्या स्कूटरला कारने दिलेल्या धडकेत ते दोघे ठार झाले होते. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर त्यांच्या वारसदारांना भरपाई वाढवून देण्याचा आदेश न्यायालयाने विमा कंपनीला दिला. त्या खटल्यात न्यायालयाने अशी भूमिका घेतली.
याआधी २००१ साली आगीमध्ये मरण पावलेल्या लता वाधवा यांच्याशी संबंधित खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, कोणत्याही गृहिणीचे घरातील काम हे तिच्या पतीच्या कार्यालयातील कामाइतकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे ते लक्षात घेऊन मृतांच्या वारसदारांना भरपाई मंजूर करावी. या निर्णयाचा दाखला न्या. रमणा यांनी निकालपत्रात दिला आहे.
९ टक्के व्याजाने भरपाई
अपघातात ठार झालेल्यांच्या वडिलांना विमा कंपनीने ११.२० लाखांऐवजी ३३.२० लाख रुपयांची भरपाई २०१४ सालापासून दरसाल ९ टक्के व्याजाने द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला.
१५कोटी महिलांचा घरकाम हा मुख्य व्यवसाय
देशातील सुमारे १५ कोटी महिलांनी आपला मुख्य व्यवसाय हा घरगुती काम असल्याचे २०११ च्या जनगणनेत नमूद केले आहे.
n त्या तुलनेत असे उत्तर फक्त ५७.९ लाख पुरुषांनी दिले असल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. त्याचाही संदर्भ सर्वोच्च न्यायालायाने आपल्या निकालपत्रात दिला आहे.