CoronaVirus: कोरोना म्हणजे काय असते? मंदिरे, गुरुद्वारांमध्ये दिवसभर रांगा; तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 05:42 AM2022-01-02T05:42:13+5:302022-01-02T05:42:26+5:30
कॅनाॅट प्लेसमध्ये माेठ्या प्रमाणावर नववर्षाचा जल्लाेष साजरा केला जाताे. यावर्षी रात्री १० वाजेनंतर संपूर्ण दिल्लीत संचारबंदी लागू केल्याने गजबज राहणाऱ्या या भागातील रस्त्यांवर यावर्षी केवळ पाेलिसांची वाहने फिरत हाेती.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीत संचारबंदी लागू असल्याने रात्री दहानंतर जल्लाेषाला मुकलेल्या दिल्लीकरांनी शनिवारी दिवसभर प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी केली हाेती. दिल्लीतील बाजारपेठांमध्येही गर्दी दिसून आली.
कॅनाॅट प्लेसमध्ये माेठ्या प्रमाणावर नववर्षाचा जल्लाेष साजरा केला जाताे. यावर्षी रात्री १० वाजेनंतर संपूर्ण दिल्लीत संचारबंदी लागू केल्याने गजबज राहणाऱ्या या भागातील रस्त्यांवर यावर्षी केवळ पाेलिसांची वाहने फिरत हाेती.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लाेकांची मंदिरे व गुरुद्वारांमध्ये दिवसभर गर्दी दिसून आली. ल्यूटन्स भागातील बांगला साहिब गुरुद्वारा, रकाबगंज गुरुद्वारा, लक्ष्मीनारायण मंदिरांमध्ये लाेकांच्या रांगा दिसून आल्या. दिल्लीत काेराेना संक्रमणाचा धाेका वाढत असतानाही लाेकांची गजबज प्रार्थनास्थळांमध्ये दिसून आली.
बाजारपेठा फुल
कॅनाॅट प्लेस, गाेलमार्केट, सराेजनी नगर, कराेलबाग, या बाजारपेठांमध्येही लाेकांनी गर्दी केली हाेती. दिल्ली सरकाराने काही बाजारपेठांमध्ये ऑड ईव्हनचे नियम लागू केले आहेत. मेट्राे व डीटीसी बसमध्ये ५० टक्के प्रवासी प्रवास करीत असल्याने बस स्थानके व मेट्राे स्थानकांवर दिवसभर गर्दी दिसून आली. डीटीसी बस व मेट्राे स्थानकांवर लाेकांना अर्धा ते एक तास वाट पाहावी लागत आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी निर्बंधांचे उल्लंघन
देशात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी पार्ट्या, धार्मिक वा सामाजिक सोहळे, समारंभ यांच्यावर जवळपास सर्वच राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली होती. कुठेही ५० हून अधिक लोकांनी एकत्र येता कामा नये, असे आदेशच सरकार व पोलिसांनी काढले.
काही ठिकाणी पूर्ण जमावबंदीच होती. त्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी लोकांनी आपल्या कुटुंबांसह, अगदी लहान मुलाबाळांसह गर्दी केली ती मंदिरे व अन्य धार्मिक स्थळांमध्ये, तसेच पर्यटनाच्या ठिकाणांकडे. वैष्णोदेवी मंदिर परिसरात शनिवारी पहाटे चेंगराचेंगरी झाली, १२ जण मरण पावले, मात्र त्यापासून धडा न घेता तिथे सकाळी लोकांची दर्शनासाठी झुंबड उडाली होती. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातही शीख भाविकांनी एकच गर्दी केली होती. वाराणसीच्या काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यांवर हजारो भाविक जमले होते. शारीरिक अंतर ठेवण्याच्या सूचनाही पायदळी तुडविण्यात आल्या.
श्रद्धा असावी, देवदर्शन घ्यावे, फिरायलाही जावे, पण हे करताना आपल्याला आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, हे पाहणे गरजेचे होते. मात्र, आपण सारे मिळून कोरोनाला निमंत्रण देणार नाही, याचे पथ्य कोणीच पाळले नाही. कोरोनाविषयक सर्व नियमांची सर्व ठिकाणी ऐशीतैशी झाली.