मोदींच्या परदेश दौ-यांतून भारताला काय मिळाले? आनंद शर्मांची राज्यसभेत घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 12:50 AM2017-08-04T00:50:42+5:302017-08-04T00:50:53+5:30

पंतप्रधान मोदींनी ६५ देशांचे दौरे केले. अमेरिकेला ५ वेळा गेले. भारताला त्याचा काही लाभ झाला का? या दौºयानंतर भारताच्या पदरात नेमके काय पडले ते पंतप्रधानांनी सभागृहाला सांगितले नाही.

What did India get from Modi's foreign travel? Anand Shame's Crisis In Rajya Sabha | मोदींच्या परदेश दौ-यांतून भारताला काय मिळाले? आनंद शर्मांची राज्यसभेत घणाघाती टीका

मोदींच्या परदेश दौ-यांतून भारताला काय मिळाले? आनंद शर्मांची राज्यसभेत घणाघाती टीका

Next

सुरेश भटेवरा।
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी ६५ देशांचे दौरे केले. अमेरिकेला ५ वेळा गेले. भारताला त्याचा काही लाभ झाला का? या दौºयानंतर भारताच्या पदरात नेमके काय पडले ते पंतप्रधानांनी सभागृहाला सांगितले नाही. देशहितासाठी विरोधक कायमच सरकारच्या पाठीशी उभे राहतात; पण शेजारी राष्ट्रांशी सुसंवाद नसेल, तर देश मजबूत बनू शकणार नाही,अशा शब्दांत काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी पंतप्रधानांवर टीका केली.
परराष्ट्र धोरणाविषयी राज्यसभेतील चर्चेत आनंद शर्मा बोलत होते. पंतप्रधान मोदी त्यापूर्वी सभागृहात उपस्थित होते. मात्र, चर्चेला सुरुवात झाल्यावर ते निघून गेल्याने विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, महत्त्वपूर्ण चर्चेच्या वेळी पंतप्रधान सभागृहात असायला हवेत, आम्हाला त्यांचे म्हणणे ऐकायचे आहे. त्यावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, सर्वांच्या प्रश्नांची मी उत्तरे देईन. त्यासाठी पंतप्रधानांची आवश्यकता नाही.
शर्मा म्हणाले की, भारताच्या ताकदीचा अंदाज सर्जिकल स्ट्राइक्समुळे आला, असा जगाला अंदाज आला की नाही, याची कल्पना नाही. मात्र, भारताच्या शेजारी राष्ट्रांनाही हा दावा मान्य नाही. असा एकही दिवस नाही की सीमेवर भारताचा जवान शहीद होत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडले आहे, अशी भाषा कशासाठी? भारताला महाशक्ती बनायचे असेल तर ही भाषा योग्य नाही.
१९७१ सालचे युद्ध जिंकल्यानंतरही इंदिरा गांधींनी ही भाषा केली नव्हती. तुम्ही स्व. इंदिरा गांधींच्या नावाचा उल्लेख करणार नाही. मात्र, देशाचा गौरवशाली इतिहास बदलता येणार नाही.
पाकबाबत सरकारच्या धोरणात स्पष्टता नाही, असे नमूद करीत शर्मा म्हणाले, अफगाणिस्तानच्या नाटकीय दौºयानंतर पंतप्रधान अचानक लाहोरला गेले. त्यांना तिथे गार्ड आॅफ आॅनर मिळाला नाही; पण पठाणकोटच्या हल्ल्याची भेट मात्र मिळाली. बांगलादेश युद्धानंतर भारत व पाककडे जग वेगळ्या नजरेने पाहत होते. आता एकाच मापाने दोन्ही देशांना सारे देश मोजतात. सरकार पाकशी कधी चर्चा करते, तर कधी चर्चेला विराम दिला जातो. गेल्या ३ वर्षांत पाकिस्तानशी तुमचे काय बोलणे झाले, एकदा हे स्पष्ट का करीत नाही?
चीन व भारत तणावाचा उल्लेख करीत आनंद शर्मा म्हणाले, पाकिस्तानात ग्वादर, श्रीलंकेत कोलंबोसह हंबनटोटा बंदरे चीन विकसित करीत आहे. चीनचा वन बेल्ट वन रोड भारताच्या अखंडतेच्या विरोधात आहे. या रोडद्वारे चीनने शेजारी राष्ट्रांना जोडले आहे. रशियाने कायम भारताची साथ दिली. आज ही मैत्री कमजोर झाली आहे. भारत नेपाळ संबंध दुरावले आहेत. इस्रायलप्रमाणे पॅलेस्टाईनशीही संबंध आवश्यक आहेत. शेजारी राष्ट्रांसह सर्वांशी भारताने सौहार्दाचे संबंध स्थापित करणे आवश्यक आहे.
बोलण्याच्या ओघात शर्मा म्हणाले की, पंतप्रधान कोणत्याही देशात गेले तर विमानातून ते एकटे उतरतात. कॅमेºयाच्या फ्रेममधे अन्य कोणी येऊ नये, याची पुरेपूर दक्षता घेतात.
परदेश दौरे एकट्यानेच करणे पंतप्रधानांना आवडते. आपल्याबरोबर ते कोणाला नेत नाहीत. काही वेळा आवडत नसूनही अन्य मंत्र्यांना नेणे गरजेचे असते.
कोणीच मित्र नाही : यादव
एकही देश आजमितीला भारताचा मित्र नाही, हे ऐकले तरी संताप येतो. जगाशी आपला संपर्क जरुर असावा. मात्र, शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध नकोत काय? भारताचे नेपाळशी संबंध दुरावले आहेत. भारत आणि रशियाच्या मैत्रीतही अंतर पडले आहे.
सिक्किम भारतात कधी विलीन झाला हे जगाला कळलेच नाही. इंदिराजींनी हे चातुर्य दाखवले होते. आज कुठे नेऊ न ठेवलाय देश? आपला मित्र देश नेमका कोण? असा मला प्रश्न पडला आहे, असे शरद यादव म्हणाले.
भाजपाचे विनय सहस्रबुद्धे म्हणाले की, निवडक प्रसंगांवरून भारताच्या परराष्ट्र धोरणाची चिकित्सा करणे योग्य नाही. परराष्ट्रांशी संबंध हे पिकांसारखे असतात. पेरणी केल्यानंतर त्याचे पीक यायला काही वेळ लागतो.

Web Title: What did India get from Modi's foreign travel? Anand Shame's Crisis In Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.