मोदींनी मागील पाच वर्षांत काय केले? एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत : वाड्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 07:28 PM2019-05-08T19:28:20+5:302019-05-08T19:58:37+5:30
बुधवारी हरियाणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर टीका केली होती.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा रॉबर्ट वाड्रा यांच्यावर पुढील पाच वर्षात तुरुंगात टाकण्याची टीका केली आहे. यावर रॉबर्ट वाड्रा यांनी गेल्या पाच वर्षांत एकही आरोप सिद्ध करु शकला नाही, माझ्या नावाचा पुन्हा मोदी फायद्यासाठी वापर करत असल्याचा आरोप केला आहे.
बुधवारी हरियाणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर टीका केली होती. महत्वाचे म्हणजे 2014 मध्ये निवडणूक प्रचारावेळी मोदींनी वाड्रा यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे उचलत काँग्रेसविरोधात वातावरण तापविले होते. हाच मुद्दा वाड्रा यांनी उचलला आहे.
हरियाणामध्ये मोदी म्हणाले होते की, देशाचा चौकीदार शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना न्यायालयात घेऊन गेला आहे. आता हे लोक न्यायालयात जामिनासाठी फेऱ्या मारत आहेत. या टीकेला वाड्रा यांनी त्यांच्या फेसबुकवर प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्यावर टीका करण्यापेक्षा मोदी य़ांनी देशातील प्रश्नांवर बोलावे. गेली पाच वर्षे त्यांनी काय केले? माझ्यावरील एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत. पंतप्रधानांनी माझे नाव घेतल्याने आश्चर्य वाटत आहे. त्यांना गरीबी, बेरोजगारी, महिला सशक्तीकरण सारखे ज्वलंत मुद्दे उचलायला हवेत. मात्र, त्यांना माझ्यावरच बोलणे आवडते.
मोदी गेल्या पाच वर्षांपासून मला त्रास देत आहेत. वेववेगळ्या तपास यंत्रणा, न्यायालये आणि आयकर विभाग मला नोटिसा पाठवत आहेत. माझ्यावर मानसिक दबाव आणणेच त्यांचा मुख्य उद्देश आहे. पण मला देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. देशातील वेगवेगळ्या अशा 11 ठिकाणांवरून मला नोटीसा पाठवून बोलावण्यात आले. 8-11 तास चौकशी करण्यात आली. मात्र मोदी माझ्याविरोधात एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत, असे त्यांनी फेसबुकवरील पोस्टवर म्हटले आहे.
मोदी त्यांच्या पाच वर्षातील अपयश झाकण्यासाठीच माझे नाव घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. व्यक्तीगत हल्ले बंद करावेत असेही त्यांनी मोदींना सुचविले आहेत. असे आरोप करून तुम्ही न्यायपालिकांचाच अपमान करत आहात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.