नोटाबंदी करून काय मिळाले? चिराग पासवान यांचा मोदी आणि जेटलींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 08:30 PM2018-12-20T20:30:39+5:302018-12-20T20:31:39+5:30
तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात मित्रपक्षही आक्रमक झाले आहेत. त्यातच बिहारमध्ये जागावाटपाचे घोडे अडल्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला तडे जाऊ लागले आहेत.
नवी दिल्ली - तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात मित्रपक्षही आक्रमक झाले आहेत. त्यातच बिहारमध्ये जागावाटपाचे घोडे अडल्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला तडे जाऊ लागले आहेत. एकीकडे उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाने आधीच एनडीएची साथ सोडून यूपीएच्या गोटात प्रवेश केला असतानाच आता रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षामधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. दरम्यान, लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून नोटाबंदीमधून काय साध्य झाले असा सवाल विचारला आहे. चिराग पासवान हे लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी लिहिलेल्या पत्राबाबत विविध तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.
नोटाबंदीला दोन वर्षे झाल्यानंतर नोटाबंदीदरम्यान रांगेत उभ्या असलेल्या लोकांचा मृत्यू झाल्याची कबुली सरकारने राज्यसभेत दिली होती. तसेच नुकत्याच संपन्न झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीदरम्यानही नोटाबंदीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. देशाचे माजी वित्तसचिव असलेल्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनीही नोटाबंदी हा अर्थव्यवस्थेला धक्का देणारा निर्णय होता, असा दावा आपल्या पुस्तकामधून केला होता. त्यानंतर आता भाजपाचा सहयोगी पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भाजपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बिहारमधील जागावाटपाबाबत नाराज असलेले रामविलास पासवान आणि चिराग पासवान यांच्याशी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी आज चर्चा केली. मात्र या चर्चेबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.