दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये करायचं काय?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला 'असा' प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 02:56 PM2019-09-29T14:56:41+5:302019-09-29T15:01:41+5:30
काही दिवसांनी दिवाळीच्या सुट्ट्या येतील. या दिवसांमध्ये तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन नक्की करा
नवी दिल्ली - भारतामध्ये कोणताही सण, उत्सव असला तर लोकांना सुट्टी दिली जाते. या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी लोक पर्यटन करायला जात असतात. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना त्यांच्या १५ ऑगस्टमधील भाषणाची आठवण करुन दिली आहे.
काही दिवसांनी दिवाळीच्या सुट्ट्या येतील. या दिवसांमध्ये तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन नक्की करा. भारताच्या अनेक भागात फिरून या, भारताला बघा, समजून घ्या आणि अनुभव करा. मी तुम्हाला १५ ऑगस्टच्या भाषणात सांगितले होते की, २०२२ पर्यंत तुम्ही देशातील १५ ठिकाणी भेट द्या, तेथील संस्कृती पाहा, त्याठिकाणी एक ते दोन दिवस राहा, यामुळे देशातील पर्यटनाला चालना मिळेल तसेच ज्याठिकाणी तुम्ही जाणार असाल तेथील स्थानिकांना रोजगार मिळेल, तुम्हालाही आपला देश किती संपन्नशाली आहे याची प्रचिती येईल असं नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.
Another request from PM @narendramodi- do travel across India in this festive season. #MannKiBaatpic.twitter.com/eD1s9bRBj5
— PMO India (@PMOIndia) September 29, 2019
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातच्या माध्यमातून देशाला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, “दिवाळीत फटाके फोडताना त्याच्या इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. आनंद असावा, कुणाला दुःख होणार नाही, याची काळजी घ्या. या उत्सवाच्या काळात अनेक लोक सणांच्या आनंदापासून वंचित राहतात. यालाच दिव्याखाली अंधःकार म्हणतात. दिवाळीत काही घरं प्रकाशाने न्हाऊन निघतील, तर दुसरीकडे काही घरं अंधारात राहतील."
मन की बातच्या सुरुवातीलाच नवरात्रोत्सव, छटपूजा, दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा त्यांनी देशवासियांना दिल्या. तसेच, नरेंद्र मोदींनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सणांचा खरा आनंद वंचित लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणून, त्यांच्या जीवनातील अंधार दूर करायचा आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, दिवाळीतील लक्ष्मी पूजेचा उल्लेख करत देशवासियांना 'भारत की लक्ष्मी' अभियान सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या संस्कृतीत मुलींना लक्ष्मी मानले जाते कारण मुली स्वत:सोबत समृद्धी घेऊन येतात. मुलींच्या सन्मानासाठी सोशल मीडियावर सेल्फी विथ डॉटरच्या पार्श्वभूमीवर 'भारत की लक्ष्मी' असे अभियान सुरु करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.