काय सांगता? बिहारमध्ये अख्खे पोलीस ठाणे १२ लाखांत विकले गेले, जनता दरबारात महिलेचा आराेप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 08:40 AM2022-06-07T08:40:28+5:302022-06-07T08:41:26+5:30
Bihar : बिहार पोलिसांच्या निष्क्रियतेचा पाढाही त्या महिलेने मुख्यमंत्र्यांसमक्ष वाचला.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : अख्खे पोलीस ठाणे बारा लाखांत विकले गेले, असे सांगत एका महिलेने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दरबारात बिहार पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केल्याने खळबळ उडाली. बिहार पोलिसांच्या निष्क्रियतेचा पाढाही त्या महिलेने मुख्यमंत्र्यांसमक्ष वाचला.
गाऱ्हाणे मांडताना ती महिला म्हणाली की, २०२१ मध्ये माझ्या मुलीची हुंड्यासाठी हत्या करण्यात आली; परंतु, तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. एवढेच नाही, लाचखोर पोलिसांनी न्याय देण्याच्या मोबदल्यात बारा लाख रुपये उकळले. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी माझ्या मुलीची हत्या केली. पोलीस ठाण्याकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. आता माझ्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
नितीश कुमार झाले अवाक्
त्या महिलेचे गाऱ्हाणे ऐकून मुख्यमंत्रीही अवाक् झाले; त्यांनी लागलीच पोलीस महासंचालकांंना फोन लावला. तक्रारदार महिलेला पाठवित आहे. हुंड्यासाठी मागच्या वर्षी हत्या करण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी केला.
पाटण्याच्या एका तरुणाने राज्यसभेचे माजी सदस्य आणि लालूप्रसाद यादव यांचे मेहुणे सुभाष यादव यांच्याविरुद्ध तक्रार केली. सुभाष यादव यांच्या पत्नीशी जमिनीबाबत करार केला होता. दुसऱ्या दिवशीच त्यांनी आम्हाला घरी बोलावून आई-भावाला ओलीस ठेवले आणि साडेपाच लाख रुपये परत घेतले. पोलीस ठाण्यात गेलो असता गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
स्वतंत्र वेळ पाहिजे, सर, माझे ऐकून घ्या...
मोतीहारी येथील जेडीयूच्या नेत्या डॉ. कुमकुम यासुद्धा जनता दरबारात आल्या होत्या. सर, मी जेडीयूची कार्यकर्ती आहे. मला तुमचा स्वतंत्र वेळ पाहिजे. माझे ऐकून घ्या. सुरक्षा कर्मचारी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा मुख्यमंत्री त्यांना म्हणाले की, तुम्ही अधिकाऱ्याकडे जाऊन तुमचे म्हणणे मांडा. तुमची तक्रार मी वाचली आहे.
जनता दरबारला बिहारच्या विविध भागातून आलेल्या तक्रारदारांनी सरकारी खात्याशी संबंधित गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांसमक्ष मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. काही लोकांनी पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप केला, तर काहींनी भूमाफियांशी साटेलोटे असल्याचे उघडपणे सांगितले.