ट्रक ड्रायव्हरनं मोडला ट्रॅफिक नियम, 2 लाख रुपयांचा दंड भरुन रचला 'नवा विक्रम'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 09:36 PM2019-09-12T21:36:43+5:302019-09-12T21:42:18+5:30
नवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली.
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना पहिल्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी चार हजार वाहनचालकांचे चलन फाडले आहे. वाहतुकीचे नियम तोडण्यावरील कारवाईमुळे हेल्मेट, सीटबेल्ट आदींच्या बाबतीत दिल्लीकर सजग असलेले आढळले. मात्र, दिल्ली पोलिसांकडून घेण्यात आलेल्या काही दंडाच्या रकमा डोळ्याच्या पापण्या उंचावणाऱ्या आहेत. रेवाडी येथील एका ट्रक मालकाने चक्क 1.16 लाख रुपयांचे चलन फाडले होते. त्यानंतर, आता राजस्थानमधील एका ट्रक ड्रायव्हरलाही दीड लाखांच्या जवळपास रुपये दंड भरावा लागला आहे. आता दंडाच्या पावतीचा आणखी एक विक्रम झाला आहे.
नवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. नव्या कायद्यानुसार मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचे नियम न पाळणे आदींसाठी पूर्वीच्या तुलनेत पाचपट दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने हा कायदा लागू करण्यात आला आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांच्या कारवाईचा अंदाज आला नाही. पण, नेमके रविवारीच अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे उपद्रवी चालकांना चांगलाच दणका बसला आहे. गेल्या 10 दिवसांत शासनाच्या तिजोरीत मोठी रक्कमही दंडाच्या स्वरुपात जमा झाली आहे.
Delhi: A truck driver challaned Rs 2,00,500 for overloading, near Mukarba Chowk. pic.twitter.com/A4xk2uG1jK
— ANI (@ANI) September 12, 2019
राजस्थानमधील एका ट्रक ड्रायव्हरने ट्रक ओव्हरलोडिंगचा दंड म्हणून चक्क 1,41,700 रुपयांचे चलन फाडले होते. त्यानंतर, पुन्हा एकदा दिल्लीतील मुबारका चौकात एका ट्रक ड्रायव्हरला मोठा दंड भरावा लागला आहे. तब्बल 2 लाख 500 रुपयांची पावती या ट्रक ड्रायव्हरने फाडली आहे. ट्रक ओव्हरलोडिंगचा नियम मोडल्याचा दंड म्हणून या ट्रक ड्रायव्हरकडून ही दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. आजपर्यंत वसुल करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेतील सर्वाधिक दंडाची रक्कम असलेली ही पावती असल्याचे समजते.