भारताच्या 10 वर्षातील कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? PM मोदींनी मागितला फीडबॅक...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 03:19 PM2024-01-01T15:19:02+5:302024-01-01T15:21:05+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NaMo अॅपद्वारे देशातील नागरिकांना आपली मते नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
नवी दिल्ली: लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळए सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे, तर भाजपचा विजय रथ रोखण्यासाठी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी पूर्ण जोर लावत आहे. अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दहा वर्षांच्या कामाबद्दल जनतेकडून फीडबॅक(प्रतिक्रिया) मागवल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी भाजप सरकारने गेल्या दहा वर्षांत देशातील विविध क्षेत्रात केलेल्या कामाबाबत जनतेकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया साइट X (पूर्वी ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी, गेल्या 10 वर्षांत भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल तुम्हाला काय वाटते? असे विचारले आहे.
What do you think of the progress achieved by India in various sectors in the last 10 years?
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2024
Share your feedback directly with me through the #JanManSurvey on the NaMo App!
Click here to participate now:https://t.co/CXcuYLI9Qx
नमो अॅपवर जन-मन सर्वेक्षण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अॅपवर जन-मन सर्वेक्षण सुरू केले आहे. ज्याद्वारे त्यांना भाजपच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील प्रगती जाणून घ्यायची आहे. नमो अॅपवर #JanManSurvey च्या माध्यमातून तुमचा फीडबॅक थेट माझ्याशी शेअर करा, असे पंतप्रधानांनी सोशल मीडियाद्वारे आवाहन केले आहे.
यापूर्वीही अभिप्राय मागविण्यात आले होते
याआधीही पीएम मोदींनी भारताच्या विकासाबाबत जनतेकडून त्यांची मते मागवली होती. त्यांनी आपल्या खासदारांच्या कामावरदेखील प्रतिक्रिया मागितल्या होत्या. याशिवाय लोकांना त्यांच्या भागातील सर्वात लोकप्रिय स्थानिक नेत्याबद्दलही सांगण्यास सांगितले होते.
जनतेची नाडी जाणण्याचा प्रयत्न
जन-मन सर्वेक्षणाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जनतेची नाडी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तीन राज्यांतील नेत्रदीपक विजयानंतर भाजपचे मनोबल उंचावलेले आहे. त्यामुळे आता पक्षाला लोकसभा निवडणुकीत कुठलीही चुकी करायची नाही. आता भाजप विजयाची हॅट्रिक मारणार की, इंडिया आघाडी मोदींचा विजयरथ रोखणार, हे येत्या काही दिवसात कळेल.