रघुनाथ पाटील यांना अर्थकारणातील काय कळते? एकनाथ खडसेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
By Admin | Published: December 29, 2014 11:46 PM2014-12-29T23:46:23+5:302014-12-30T00:10:27+5:30
रघुराम राजन यांची केली पाठराखण
रघुराम राजन यांची केली पाठराखण
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करून वादाच्या भोवर्यात सापडलेले महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी अजून एकदा वादाला निमंत्रण देत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांना अर्थकारणातील काय कळते,अशी खोचक टीका केली आहे. तसेच शेतकर्यांबाबत वास्तव वक्तव्य केल्याचे सांगत रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची पाठराखण केली आहे.
नाशिक सिटीझम फोरमच्या कार्यक्रमासाठी नाशिकला आले असता शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आत्महत्त्यांवर शंभर टक्के उपाय सध्या तरी सापडत नसल्याचे सांगत त्यांनी रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शेतकर्यांसाठी केली जाणारी कर्जमाफीविषयी केलेल्या वक्तव्याची पाठराखण केली आहे. राजन अर्थतज्ज्ञ असून, त्यांचा आर्थिक अभ्यास असल्याने त्यांनी ते वक्तव्य केल्याचे सांगितले. राजन यांच्या वक्तव्यास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी विरोध करीत त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याच्या विधानबाबत एकनाथ खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, पाटील यांना शेतीचे कळत असले तरी, आर्थिक ज्ञान नसल्याचे खडसे यांनी यावेळी सांगितले. द्राक्षबागा व फळबागांचे नुकसान झाल्याने त्यांना शासनाने दिलेली मदत तोकडी आहे. फळबागा उत्पादकांना उभे राहण्यासाठी जास्तीत जास्त निधी शासन देणार असून, त्यासाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी करण्यात आलेली आहे. शेतकर्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरू असल्या तरी, काही केल्या हे आत्महत्त्यांचे सत्र थांबत नाही. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकर्यांचे प्रबोधन केल्यास आत्महत्त्या थांबू शकतील. त्याचप्रमाणे राज्यात कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र कृषी बजेट मांडणार काय? अशी विचारणा केली असता त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प तयार करतानाच ओढाताण करावी लागणार आहे. त्यामुळे कृषीसाठी वेगळा वेगळा अर्थसंकल्प तयार करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
इन्फो..
निर्णय मानेंचा, शासन अंधारात
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील आडत बंद करण्याचा निर्णय कृषिमंत्री अथवा सहकारमंत्र्यांना माहिती न देताच परस्पर स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी पणन संचालक सुभाष माने यांनी घेतल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. वस्तुत: निर्णय शेतकरी हिताचा असला तरी आम्हाला त्याची कल्पना नसल्याने व्यापारी, आडतदारांना उत्तरे द्यावी लागली. लवकरच या निर्णयाला दिलेली स्थगिती उठविण्यात येईल, असे खडसे यांनी सांगितले.