सर्जिकल स्ट्राइक आणि लाँच पॅड्स म्हणजे नेमके काय?
By admin | Published: September 30, 2016 01:39 AM2016-09-30T01:39:49+5:302016-09-30T01:39:49+5:30
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतात घुसण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या गटांविरुद्ध गुरुवारी पहाटे केलेल्या कारवाईची माहिती देताना लष्करी कारवाई महासंचालक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतात घुसण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या गटांविरुद्ध गुरुवारी पहाटे केलेल्या कारवाईची माहिती देताना लष्करी कारवाई महासंचालक लेफ्ट. जनरल रणवीर सिंग ‘सर्जिकल स्ट्राइक’ आणि ‘लॉन्च पॅड््स’ असे दोन शब्द वापरले. ही कारवाई प्रत्यक्षात कशी फत्ते केली गेली याचा तपशील उघड करणे लष्करी सज्जता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मारक असल्याने तो स्वाभाविकपणे गुलदस्त्यात ठेवण्यात आला. ‘सर्जिकल स्ट्राइक’ व ‘लॉन्च पॅड’ म्हणजे काय हे समजून घेतले, तर आपल्या सैनिकांनी नेमके काय केले याची ढोबळमानाने कल्पना येऊ शकेल.
पूर्वनिर्धारित लष्करी लक्ष्यावर अत्यंत अचूकतेने व चपळाईने केलेल्या हल्ल्यास युद्धशास्त्रात ‘सर्जिकल स्ट्राइक’ असे म्हटले जाते. वैद्यकशास्त्राच्या परिभाषेतून हा शब्द आलेला आहे. एखादा कुशल शल्यचिकित्सक तरबेज हातांचा आणि खास शल्यक्रिया आयुधांचा वापर करून जिकिरीची पण प्राणरक्षक शस्त्रक्रिया करून व्याधीस कारणीभूत ठरणारे शल्य लगद दूर करतो. त्याच प्रमाणे ‘सर्जिकल स्ट्राइक’ ही लष्कराने केलेली जोखमीची शल्यक्रिया असते. सोप्या भाषेत त्याला वैद्यकीय शस्त्रक्रियेचे लष्करी भावंड म्हणता येईल. यात ठरलेल्या लक्ष्याचा परिपात करणे, हेच एकमेव उद्दिष्ट असते. कारण अशा कारवाईचे स्वरूप आणि त्यातील जोखीम पाहता त्यात अपयश येणे आत्मघाती ठरणारे असते.
अर्थात कोणतीही शस्त्रक्रिया करण्याआधी नेमके शल्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी जशा नानाविध चाचण्या आणि तपासण्या केल्या जातात, तशी जय्यत पूर्वतयारी हा लष्करी ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या यशाचा भक्कम पाया असतो. गुप्तहेर आणि खबऱ्यांकडून पक्की माहिती घेऊन ज्या लक्ष्याचा नि:पात करायचा आहे त्याची इत्थंभूत खबर आधी गोळा केली जाते. यात लक्ष्य नेमके कुठे आहे, त्याची बलस्थाने व कमकुवत जागा कोणत्या, कारवाईसाठी सर्वांत परिणामकारक वेळ कोणती, प्रतिहल्ल्याची शक्यता किती व त्याचे स्वरूप काय असू शकेल, कारवाईच्या चक्रव्यूहात शिरल्यावर फत्ते करून सुखरूप बाहेर कसे यायचे, प्रसंगी कारवाई फसली किंवा अर्धवट सोडावी लागली, तरी स्वत:ची कमीतकमी हानी होईल, अशा प्रकारे शिताफीने माघार कशी घ्यायची, या आणि अशा कितीतरी गोष्टी या पूर्वतयारीत येतात. (वृत्तसंस्था)
सर्जिकल स्ट्राइक
फक्त लक्ष्य टिपायचे, पण ते करताना अनुषंगिक हानी (कोलॅटरल डॅमेज) अजिबात होऊ द्यायचे नाही किंवा झालेच तरी ते कमीतकमी ठेवायचे, हे ‘सर्जिकल स्ट्राइक’चे वैद्यकीय शल्यक्रियेशी नाते सांगणारे दुसरे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. लक्ष्य ही एखादी व्यक्ती अथवा व्यक्तिसमूह असेल, तर शक्यतो फक्त त्यांनाच टिपायचे व आजूबाजूच्या परिसराची, इमारतींची, वाड्या-वस्त्यांची हानी होऊ द्यायची नाही. यावरून स्पष्ट होते की, पारंपरिक पद्धतीची शस्त्रायुधे वापरून ‘सर्जिकल स्ट्राइक’ साध्य होऊ शकत नाही. त्यासाठी खास प्रशिक्षण दिलेल्या सैन्यदलाच्या जाँबाज तुकड्या वापरल्या जातात व शस्त्रायुधेही सरसकट व्यापक संहार करण्याऐवजी अचूक आणि बिनचूक मारा करणारी असावी लागतात.
गेल्या काही महिन्यांत ‘एलओसी’ ओलांडून भारतात शिरलेल्या किंवा शिरू पाहणाऱ्या १२५हून अधिक पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांना लष्कराने काश्मीरमध्ये सीमेवरच किंवा सीमेलगत कंठस्नान घातले आहे. आताची ताजी कारवाई हे यापुढे टाकलेले पाऊल होते. या वेळी हे दहशतवादी सीमेच्या पलीकडे असतानाच त्यांना लक्ष्य केले गेले. लष्कराकडे असे करण्याचे दोन पर्याय होते. सीमा न ओलांडताच तोफखाना व क्षेपणास्त्रांचा मारा करून पलीकडचे लक्ष्य टिपायचे किंवा जोखीम पत्करून खास प्रशिक्षित सैनिकांची तुकडी सीमा ओलांडून प्रत्यक्ष लक्ष्यापर्यंत पाठवायची. भारतीय लष्कराने यापैकी दुसरा पर्याय निवडल्याचे दिसते. उपलब्ध संकेतांनुसार यासाठी छत्रीधारी सैनिक (पॅराट्रुपर्स) पाठविले गेले. ते प्रतिस्पर्ध्याला सुगावा लागणार नाही, अशा बेताने निबिड काळोखात लक्ष्याच्या जवळपास उतरले आणि आपली कामगिरी फत्ते करून झुंजुमुंजू व्हायच्या आत सुखरूप परतले.
लॉन्च पॅड्स : लॉन्च पॅड्स म्हणजे दहशतवाद्यांच्या तुकडीचे प्रत्यक्ष सीमा ओलांडण्यापूर्वी एकत्र जमून कूच सुरू करण्याच्या पडावाचे ठिकाण. भारताविषयी विखार पाजून भडकविलेल्या अठरापगड अतिरेकी संघटनांच्या दहशवाद्यांना प्रशिक्षण देणारी केंद्रे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सीमेपासून बरीच आतील भागात आहेत. त्या तुलनेने लॉन्च पॅड्स सीमेच्या जवळपास आहेत. सीमेवरील पाकिस्तानी चौक्यांच्या छत्रछायेत ही लॉन्च पॅड्स आहेत, असे म्हणता येईल. प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षित केलेल्या दहशतवाद्यांपैकी कोणाला सीमेच्या पलीकडे पाठवायचे हे ठरले की त्यांचे गट वा तुकड्या करून त्यांना या लॉन्च पॅडच्या ठिकाणी आणले जाते. तेथे त्यांना शस्त्रे व अन्य रसद पुरविली जाते व शेवटच्या सूचना देऊन प्रत्यक्ष मोहिमेवर रवाना केले जाते.