आदित्य एल-१ नक्की काय करणार?; कसा असेल चार महिन्यांचा प्रवास, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 09:22 AM2023-09-03T09:22:27+5:302023-09-03T09:22:34+5:30
चंद्रयान-३च्या यशानंतर इस्रोचे आदित्य एल-१ सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात झेपावले.
नवी दिल्ली : चंद्रयान-३च्या यशानंतर इस्रोचे आदित्य एल-१ सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात झेपावले. हा उपग्रह सूर्याच्या ‘एल-१’ पाॅइंटवर स्थापित होईल. हे अंतर चंद्राच्या अंतरापेक्षा चारपट म्हणजे पृथ्वीपासून १५ लाख किलाेमीटर आहे. पृथ्वी ते सूर्याचे अंतर जवळपास १५ काेटी किलाेमीटर आहे. सूर्याचा किरणोत्सर्ग, सूर्याचा कोरोना तसेच सौरवायू, सौर वादळे यांचा अभ्यास आदित्य करणार आहे.
आदित्य-एल१ मध्ये वेगळे काय?
सूर्यातून निघणाऱ्या अतिनील किरणांचा सोलार डिस्कमध्ये (पृथ्वीवरून दिसणारा सूर्याचा वर्तुळाकार आकार) संशोधन सूर्याभोवतीच्या वातावरणासह त्यावर होणाऱ्या विस्फोटांचाही अभ्यास सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान आणि सौर वाऱ्यांची गती मोजणे सूर्यावर होणाऱ्या विस्फोटांसह त्यातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेचा पृथ्वीभोवतीच्या वातावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सौर विस्फोट आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या उष्ण लहरींचा अभ्यास करण्यासाठी आदित्य-एल१ मध्ये एआयचा वापर केला आहे.
काय आहे लॅग्रेज पॉइंट?
अवकाशातील दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण शक्ती प्रभावशून्य असलेल्या ठिकाणाला लॅग्रेज पॉइंट म्हणतात. आदित्य-एल-१ ज्याठिकाणी जाणार आहे, त्या लॅग्रेज पॉइंट (एल-१) ठिकाणी पृथ्वी आणि सूर्यामधील गुरुत्वाकर्षण शक्तीचा कोणताही परिणाम होत नाही. अंतराळात अशाप्रकारे एल-१, एल-२, एल-३, एल-४ आणि एल-५ असे पाच लॅग्रेज पॉइंट आहेत. त्यापैकी एल-१, एल-२ आणि एल-३ हे सूर्य आणि पृथ्वीदरम्यानच्या सरळरेषेत, तर एल-४ आणि एल-५ हे पृथ्वीच्या दोन्ही बाजूला समपातळीवर आहे.
दररोज टिपणार सूर्याची १,४०० छायाचित्रे
आदित्य-एल १ मधील व्हिजिबल एमिशन लाइन कोरोनाग्राफ (व्हीइएलसी) हे उपकरण दरदिवशी सूर्याची १,४०० छायाचित्रे पाठवणार आहे. त्याद्वारे सूर्यावरील स्थितीचे इस्रो विश्लेषण करणार आहे. व्हीइएलसी या उपकरणाची निर्मिती इस्रो व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सची संलग्न संस्था सेंटर फॉर रिसर्च अँड एज्युकेशन इन सायन्स टेक्नॉलॉजी (क्रेस्ट) यांनी संयुक्तरीत्या केली आहे.
सनस्पॉट म्हणजे काय?
सूर्याच्या पृष्ठभागावरील थंड भागाला सनस्पॉट म्हणतात. पृथ्वीवरून दिसणाऱ्या सूर्याच्या भागात (प्रकाशमंडळ) ते असतात. सनस्पॉटचा सामान्यत: ५० हजार किमी क्षेत्रात पसरलेले असतात.
आदित्य एल-१ उपकरणे काय करतील?
व्हिजिबल एमिशन लाइन कोरोना ग्राफ (VELC)
सौरवादळे आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेचा अभ्यास करणे. (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, बंगळुरू)
सोलार अल्ट्रा-व्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT)
सूर्याचा पृष्ठभाग आणि त्यावरील वातावरणाचे छायाचित्रीकरण आणि सूर्यातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे वितरण मोजणे. (इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी ॲण्ड ॲस्ट्रोफिजिक्स, पुणे)
आदित्य सोलार विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (ASPEX) आणि प्लाझ्मा ॲनालायझर पॅकेज फॉर आदित्य (PAPA)
सौरवादळे आणि त्यातून होणाऱ्या ऊर्जा वितरणाचा अभ्यास करणे. (फिजिकल रिसर्च लेबॉरेटरी, अहमदाबाद व स्पेस फिजिक्स लेबॉरेटरी, तिरुवनंतपुरम)
सोलार लो एनर्जी एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (SoLEXS) आणि हाय एनर्जी एल-१ ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (HEL1OS)
सूर्यावरून बाहेर पडणाऱ्या क्ष-किरणांचा अभ्यास करणे. (यू. आर. राव सॅटेलाइट सेंटर, बंगळुरू)
मॅग्नेटोमीटर (MAG)
आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणे. (लॅबॉरेटरी फॉर
इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टिम, बंगळुरू)