जीडीपी म्हणजे नेमके काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:29 AM2019-08-31T05:29:12+5:302019-08-31T05:29:16+5:30

एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रकृती जोखण्याचे सर्वच देशांमध्ये वापरले जाणारे प्रमुख साधन आहे.

What is GDP? you have to know | जीडीपी म्हणजे नेमके काय?

जीडीपी म्हणजे नेमके काय?

googlenewsNext

एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रकृती जोखण्याचे सर्वच देशांमध्ये वापरले जाणारे प्रमुख साधन आहे. देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादने आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन होय.


जीडीपी मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात असला तरी भारतात खालील सुत्रानुसार त्याची मोजणी केली जाते.
जीडीपी = खासगी उपयोग
+ त्यामध्ये झालेली एकूण गुंतवणूक + सरकारी गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात)
जीडीपीमध्ये होणारी वाढ अथवा घट ही देशाच्या सामाजिक व आर्थिक बदलाला कारणीभूत ठरत असते. देशातील गरीबी, बेरोजगारी, जीवनाची पातळी, साक्षरता आणि आरोग्यसेवा या विविध बाबी जीडीपीवर अवलंबून असतात. जीडीपी वाढला की या विविध सेवांवरील सरकारी खर्चासाठी अधिक रक्कम उपलब्ध होते. मात्र जीडीपी कमी झाल्यास सामाजिक सेवांवरील खर्चात कपात करणे सरकारला भाग पडते. त्यामुळे देशाचा विकास कमी प्रमाणात होताना दिसतो.


जीडीपीची मोजणी
कोणाकडून?

भारतात सांख्यीकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय हे जीडीपीच्या मोजणीसाठी जबाबदार असते. केंद्रीय सांख्यीकी कार्यालयातील अकाऊंट विभाग हा जीडीपीची मोजणी करीत असतो. जीडीपीची मोजणी ही दर ३ महिन्यांनी केली जाते. दरवर्षी ३१ मे रोजी वार्षिक जीडीपीची घोषणा केली जात असते. विविध वस्तूंच्या स्थिर किमती आणि सध्याच्या बाजारभावानुसार असलेल्या किमती या दोन्ही पद्धतींनी जीडीपी मोजला जातो.
कोणत्या क्षेत्राचा किती वाटा
देशाच्या जीडीपीमध्ये विविध क्षेत्रांचा वेगवेगळा वाटा असतो. भारताच्या जीडीपी मोजणीमध्ये
कृषी क्षेत्राचा वाटा १७ टक्के तर औद्योगिक क्षेत्राचा वाटा २९ टक्के आहे. सर्वाधिक ३० टक्के वाटा हा सेवा क्षेत्राकडे आहे.
१९९१ मध्ये भारताने खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण स्विकारल्यानंतर पुढील दशकात जीडीपीचा वाढीचा दर दरवर्षी सरासरी ६ ते ७ टक्के राहिला. सन २०१४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वाढ देणारी अर्थव्यवस्था होती.
सन २०१० मध्ये सर्वाधिक वाढ
भारताच्या जीडीपीमध्ये सन २०१० मध्ये सर्वाधिक म्हणजे १०.३ टक्के एवढी वाढ झाली होती. त्याआधी सन २००७ मध्ये ९.८ टक्के तर १९८८ मध्ये ९.६ टक्यांनी जीडीपी वाढला होता. याशिवाय २००५ आणि २००६ या दोन वर्षात जीडीपी वाढीचा दर ९.३ टक्के होता.
भारतीय अर्थव्यवस्थेला नविन दिशा देणारे सन १९९१ मध्ये जीडीपीच्या वाढीचा दर १.१ टक्का असा सर्वात कमी राहिला. याआधी १९८२ मध्ये ३.५, १९८४ मध्ये ३.८, २००२ व २००८ मध्ये ३.९ असाही जीडीपीच्या वाढीचा दर राहिला.

Web Title: What is GDP? you have to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.