अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:58 AM2019-04-05T08:58:52+5:302019-04-05T09:08:50+5:30
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही असं नियोजन करत होतो की आम्ही हल्ला करु पण पाकिस्तानला तोंड उघडता येणार नाही.
नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही असं नियोजन करत होतो की आम्ही हल्ला करु पण पाकिस्तानला तोंड उघडता येणार नाही. सामान्य जनतेचे नुकसान न करता दहशतवाद्यांना टार्गेट करायचं हे लक्ष्य करायचं आमचं ठरलं. त्यादृष्टीने सगळं नियोजन करण्यात आलं. या सर्व प्रक्रियेत मी बारकाईने लक्ष देत होतो. मला माहीत होतं रात्री 1 वाजता वायूदलाचे जवान पाकिस्तानात घुसणार आहेत. माझे जवान आपला जीव धोक्यात घालून स्ट्राईक करुन पुन्हा येईपर्यंत मला झोप नव्हती अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मोदी यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, मी कधीही राजकीय विचार करुन निर्णय घेतले नाहीत. ज्या रात्री बालकोट भागात एअर स्ट्राईक करण्यात येणार होतं. तेव्हा मी त्यावर लक्ष ठेवून होतो. जवान किती वाजता निघणार? किती वाजता हल्ला होणार? हे सगळं मला माहीत होतं. जवानांनी एअर स्ट्राईक केल्यानंतर पहाटे 4 वाजता मला फोन आला, काम फत्ते झालं आपले जवान सुखरुप परत आले तेव्हा मी सुटकेचे निश्वास सोडला असं मोदी यांनी सांगितले.
त्यानंतर मी सोशल मिडीयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठे काही हालचाल झालीय का हे पाहत होतो. 5 पर्यंत काहीच झालं नव्हतं. कुठे बातमी नव्हती मात्र साडेपाच सुमारास पाकिस्तानमधील एकाने ट्विट केलं त्यानंतर ही घटना समोर आली. आम्ही कोणालाच काही बोललो नाही. त्यानंतर मी लगेच अधिकाऱ्यांना फोन करुन बैठक बोलवली होती. सकाळी 7 वाजता पुढील नियोजनासाठी माझ्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली असही मोदींनी सांगितले.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालकोट परिसरात दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट केलं. एअर स्ट्राईकचं पुरावा सगळ्यात आधी पाकिस्तानच्या लोकांनीच दिला. किती मारले किंवा नाही हा संशय इथल्या लोकांना आहे. दहशतवादी मारल्यामुळे पाकिस्तानची बोलती बंद झाली. नेमकं भारताने काय केलं हे सांगण्यासाठी पाकिस्तानला उघडपणे जगाला सांगता येणार नाही. माझं काम भारताच्या हिताचे रक्षण करणं आहे. आपलेचे नेते पुरावा मागत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.