‘त्या’ १३ तासांत काय घडलं? गर्भवती महिलेच्या पतीने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा थरारक अनुभव!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 03:42 PM2020-06-11T15:42:16+5:302020-06-11T15:47:03+5:30
माझ्या पत्नीला रात्री त्रास होत होता, तिच्या कमरेत दुखत होतं. त्यानंतर श्वास घेण्यास अडचण आली, तिला ईएसआय रुग्णालयात घेऊन गेलो, इमरजेन्सी वार्डमध्ये तिला शिफ्ट केले, हॉस्पिटलला जाताना ती चालत होती, फक्त कमरेत दुखत होतं.
नोएडा – दोन दिवसांपूर्वी नोएडा येथील एका ८ महिन्याच्या गर्भवती महिलेचा उपचाराविना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती, या महिलेला १३ तास विविध हॉस्पिटलमध्ये जाऊनसुद्धा कोणीही दाखल करुन घेतले नाही, त्यामुळे अखेर या महिलेचा उपचाराविना मृत्यू झाला. या घटनेतील आणखी कटू सत्य आता महिलेच्या पतीने उघड केले आहे.
गर्भवती पत्नी मरणाच्या दारात असताना पती बृजेंद्र सिंहला विचारत होती, माझ्यावर उपचार का होत नाहीत? पीडित गर्भवतीला त्रास होत असतानाही तिला कानाखाली मारण्याची धमकी आणि अमानुषपणे वागणूक दिली असा आरोप पतीने केला. नोएडाच्या एका हॉस्पिटलमध्ये पत्नीचा मास्क किंचित खाली आला त्यामुळे पीपीई किट घातलेल्या नर्सने तिला कानाखाली मारेन, मास्क वर घे अशाप्रकारे धमकी दिली. वेदनेने त्रस्त असलेल्या रुग्णासोबत अशाप्रकारे वागणूक केल्याने पतीने उपचाराविना घरी राहू पण अशा वागणुकीमुळे हॉस्पिटलमध्ये कोणी जाणार नाही असं सांगितले.
माझ्या पत्नीला रात्री त्रास होत होता, तिच्या कमरेत दुखत होतं. त्यानंतर श्वास घेण्यास अडचण आली, तिला ईएसआय रुग्णालयात घेऊन गेलो, इमरजेन्सी वार्डमध्ये तिला शिफ्ट केले, हॉस्पिटलला जाताना ती चालत होती, फक्त कमरेत दुखत होतं. डॉक्टरांनी तिला तपासून युरिनची थैली लावली आणि नवऱ्याला बोलवायला सांगितले, मी पोहचल्यानंतर डॉक्टरांनी मला ओरडत हिला मरायला इथे आणलं का? असा प्रश्न केला. नर्सची अशी वागणूक आणि डॉक्टरांनी ओरडल्यामुळे माझी पत्नी घाबरली, एक दीड तासानंतर आम्हाला उपचाराविना हॉस्पिटलमधून जायला सांगितले.
त्यानंतर पत्नीला घेऊन आम्ही जिल्हा सरकारी रुग्णालयात गेलो, त्याठिकाणी आम्ही व्हिलचेअरवरुन पत्नीला दवाखान्यात नेले, तिथे डॉक्टरांनी तिला पाहताच उपचार होणार नाहीत, तुम्ही येथून घेऊन जा असं सांगितले. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या पत्नीवर उपचार सुरु असणाऱ्या शिवालिक हॉस्पिटलला पोहचलो, आम्हाला वाटलं त्याठिकाणी दाखल करुन घेतील, पण त्याठिकाणीही आमची अपेक्षा भंग झाली. त्यानंतर फोर्टिस हॉस्पिटलला तिला घेऊन गेलो.
फोर्टिस हॉस्पिटला गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं पत्नीची तब्येत गंभीर झाली आहे. तिला इथे उपचार करता येणार नाहीत, तिला व्हेंटिलेटरवर ठेवायला लागेल, हवं ते करा पण तिच्यावर उपचार करा असं विनवणी डॉक्टरांना वारंवार केली, त्यानंतर त्यांनी ५-६ लाख रुपये मागितले तर देशील का? असं विचारलं, तर मी पैशाचा बंदोबस्त करतो पण उपचार करा असं सांगितल्यानंतर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, तिला येथून घेऊन जा असं सांगितले. यानंतर तिथून पुन्हा जिम्स आणि शारदा हॉस्पिटला घेऊन गेलो तिथेही दाखल करण्यात आलं नाही,
अखेर वैशालीच्या मॅक्स हॉस्पिटलच्या इमरजेन्सी वार्डमध्ये पोहचलो, तिथे डॉक्टरांनी आमच्याकडे बेड्स उपलब्ध नाहीत सांगितले, परत आम्ही जिम्स हॉस्पिटलला आलो, पण रुग्णवाहिकेला हॉस्पिटलच्या गेटवरच अडवले, त्यावेळी थोड्यावेळानंतर आम्ही पत्नी निलमकडे पाहिले तिचा मास्क काढला त्यावेळी तिचा मृत्यू झाल्याचं आढळलं, माझ्यावर उपचार का होत नाहीत, मला दाखल का करु घेतलं जात नाही, मी मरेन असं वारंवार पत्नी नवऱ्याला सांगत राहिली पण अखेर तेच खरं ठरलं, या लोकांनी माझ्या पत्नीची आणि मुलाची हत्या केली आहे. माझी पत्नी मुलाला जन्म देणार होती, दोन दिवसानंतर माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, आमच्या घरात आनंद साजरा होणार होता, पण आता त्याची आई परत येणार नाही हे त्या मुलाला कसं सांगणार अशी व्यथा पती बृजेंद्र सिंह यांनी मांडली.