NDAच्या बैठकीत काय झालं? नितीश कुमार, चंद्राबाबू यांची भूमिका काय?; CM शिंदेंनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 09:07 PM2024-06-05T21:07:29+5:302024-06-05T21:15:37+5:30
एनडीएच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत नेमकं काय घडलं, याबाबत माहिती दिली आहे.
CM Eknath Shinde ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला सलग तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाल्यानंतर आज नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत एनडीएतील मित्रपक्षांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत नेमकं काय घडलं, याबाबत माहिती दिली आहे.
"लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आज दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांचे या विजयाबद्दल अभिनंदन करून त्यांना पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड, चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम प्रमाणेच शिवसेनेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी तयार असल्याचे सांगत जाहीर पाठींबा दिला," अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनी भाजपला समर्थन पत्रे सोपवली
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमताचा जादुई आकडा पार करता आला नाही. त्यामुळेच आता त्यांना मित्रपक्षांची गरज लागणार आहे. विशेष म्हणजे, जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे एन चंद्राबाबू नायडू एनडीए सरकार स्थापन करण्यात किंगमेकरची भूमिका बजावत आहेत. या निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकल्या, ज्या बहुमताच्या आकड्यापेक्षा ३२ ने कमी आहे. तर, टीडीपी आणि जेडीयूकडे एकूण २८ जागा आहेत. आजच्या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी भाजपला समर्थनाची पत्रे दिली आहेत. म्हणजेच, नितीश आणि चंद्राबाबू यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे.