रजा कसली? पंतप्रधान असतात सदैव डयूटीवर!
By admin | Published: October 11, 2016 11:18 PM2016-10-11T23:18:07+5:302016-10-11T23:38:08+5:30
भारताचे पंतप्रधान सदैव ड्युटीवरच असतात, असे नमूद करून पंतप्रधानांनी घेतलेल्या रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने माहिती अधिकार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान सदैव ड्युटीवरच असतात, असे नमूद करून पंतप्रधानांनी घेतलेल्या रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने माहिती अधिकार कायद्यान्वये (आरटीआय) केलेल्या एका अर्जाला दिले आहे.
पंतप्रधानांना लागू असलेले रजाविषयक नियम आणि ती मंजूर करण्याची पद्धत याची माहिती मागितली असता पंतप्रधान कार्यालय आणि कॅबिनेट सचिवालयाने हे उत्तर दिले. पंतप्रधान सदैव ड्युटीवर आहेत, असेच मानले जाते, असे पीएमओने कळविले.
डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, एच. डी.देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, पी. व्ही. नरसिंह राव, चंद्रशेखर, व्ही. पी. सिंग आणि राजीव गांधी या माजी पंतप्रधानांनी कधी रजा घेतली होती का आणि घेतली असल्यास त्याचे रेकॉर्ड उपलब्ध आहे का, अशी विचारणा या ‘आरटीआय’ अर्जाव्दारे करण्यात आली होती.
याला उत्तर देताना ‘पीएमओ’च्या माहिती अधिकाऱ्याने कळविले की, माजी पंतप्रधानांनी घेतलेल्या रजांचे रेकॉर्ड या कार्यालयाकडे उपलब्ध नाही. मात्र विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदावर आल्यापासून एकदाही रजा घेतलेली नाही, असे मात्र या उत्तरात नमूद केले गेले.
अशीच माहिती मागणारा अर्ज कॅबिनेट सचिवालयाकडेही केला गेला होता. परंतु तेथून तो गृहमंत्रालयाकडे व तेथून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला. परंतु या कार्यालायने त्यांच्याकडे माजी पंतप्रधानांच्या रजेचे रेकॉर्ड नसल्याचे कळविले.
कायदा वा नियम नाहीत
राज्यघटनेत पंतप्रधान, मुख्यमंत्री व अन्य मंत्री यांच्या नेमणुकीची तरतूद आहे. त्याला अनुसरून संसदेने व राज्य विधिमंडळांनी कालांतराने त्यांच्या पगार आणि भत्त्यांसंबंधीचे नियम केले. पण त्यात रजा मागण्याची अथवा मंजूर करण्याची कुठेही तरतूद नाही. राजीव गांधी व अटल बिहारी वाजपेयी यांनी काही दिवस ‘व्हेकेशन’वर जाण्याची प्रथा सुरु केली होती. पण तेव्हाही ते औपचारिक रजेवर नव्हते. म्हणून तर सध्या आजारी असलेल्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रजा मंजूर न करता राज्यपालांनी त्यांची काती तेथील वित्तमंत्र्यांकडे दिली आहेत.