‘इंदिरा गांधींसोबत जे घडलं तेच तुमच्यासोबत करू’, खलिस्तानी नेत्याची अमित शाह यांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 09:13 AM2023-02-21T09:13:01+5:302023-02-21T09:13:54+5:30
Amit Shah: खलिस्तान समर्थक नेता आणि वारिस ए पंजाब दे चा प्रमुख अमृतपाल सिंग याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
खलिस्तान समर्थक नेता आणि वारिस ए पंजाब दे चा प्रमुख अमृतपाल सिंग याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. जे इंदिरा गांधींसोबत झालं तेच तुमच्यासोबत करू अशी धमकी अमृतपाल सिंग याने दिली आहे. पंजाबी चित्रपटांमधील अभिनेता आणि कार्यकर्ता संदीप सिंग उर्फ दीप सिद्धू याच्या वर्षश्राद्धादिवशी या खलिस्तानी नेत्याने लोकांना संबोधित करताना प्रक्षोभक भाषण केले. यादरम्यान, त्याने सांगितले की, पंजाबमधील प्रत्येक मूल आज खलिस्तानबाबत बोलत आहे. ज्याला जे काही करायचंय ते करून घ्या. आम्ही आमचा हक्क मागतोय. या भूमीवर आम्ही राज्य केलं आहे. या भूमीवर आमचाच हक्क आहे. तिच्यावर राज्य करण्याचा दावाही आमचाच आहे. त्यापासून कुणीही मागे हटणार नाही. मग अमित शाह येवो, नरेंद्र मोदी येवो, अथवा भगवंत मान येवो, जगभरातील फौज आली तरी आम्ही हा दावा सोडणार नाही.
अमृतपाल सिंग म्हणाला की, दीपने संत भिंडरावालेच्या मार्गावरून वाटचाल करत भारतीय सत्ताधाऱ्यांशी पंगा घेतला होता. आज त्याच शहिदांची आठवण म्हणून येथे एक शहीद स्मारक गेटचं उदघाटन करण्यात आलं आहे. येथे आयोजित अमृत संचार समागम रोखण्यासाठी सरकारने खूप प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. आधीच्या सरकारनेसुद्धा आमचा समागम रोखण्याचे प्रयत्न केले होते.
सरकार आम्हाला अटक करण्याचा बाता मारत आहे. मात्र त्यांना माहिती असलं पाहिजे की, आम्ही जत्थ्यासह अटक करवून घेतो. आम्ही तुरुंगातही अमृत संचार करू. जर तुरुंगात जाऊन आम्हाला धर्मप्रसार करावा लागला, तर तोही आम्ही करू. सरकारने आमच्यासोबत कुठलीही चालाखी करू नये, असा इशाराही त्याने दिला आहे.
अमृतपास सिंगने आपल्या संबोधनात पुढे सांगितले की, सरकार मला पकडण्यासाठी छापेमारीची खोटी अफवा पसरवत आहे. मात्र मी कुठे आहे, हे सर्वांना माहिती आहे. ज्यांना जे काही करायचे आहे ते करू द्या. मात्र सर्वसामान्यांना त्रास देऊ नका. त्या मुलाचा काय गुन्हा होता की त्याला रिमांडवर घेण्यात आलं. आता प्रत्येक मूल खलिस्तानबाबत बोलत आहे. ज्यांना जे काही करायचं आहे ते करू द्या, पण आमचा हक्क आम्हाला परत करा.