जे आज काश्मिरींंसोबत घडतंय ते उद्या आपल्याबरोबरही घडणार; अखिलेश यादव यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 03:33 PM2019-08-26T15:33:26+5:302019-08-26T15:34:35+5:30
कलम 370 हटविल्यानंतर काश्मिरी लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, त्यांनी रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला का?
लखनऊ - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर विरोधकांमध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी कलम 370 हटविण्यावर केंद्र सरकारला अप्रत्यक्ष समर्थन देत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या काश्मीर दौऱ्यावर टीका केली होती. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. आज जे काश्मिरी लोकांसोबत घडतंय ते उद्या आपल्यासोबतही घडेल असा इशारा अखिलेश यादव यांनी दिला आहे.
लखनऊमध्ये अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये कलम 370 हटविण्याच्या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांना उत्तर दिले. आज 20 दिवसांहून अधिक दिवस झाले आहेत लोकांना त्यांच्या घरात कैद केलं आहे. सरकारने जर इतका धाडसी निर्णय घेतला तर त्यापूर्वी लोकांना विचारात का घेतलं नाही? नक्की काश्मीरात काय चाललंय याची माहिती पत्रकारांनी द्यावी. कलम 370 हटविणे भाजपाच्या जाहिरनाम्यात होतं. कलम 370 हटविल्यानंतर काश्मिरी लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, त्यांनी रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला का? जे आज काश्मिरी लोकांसोबत घडत आहे ते भविष्यात आपल्यासोबतही घडू शकेल असं सांगत त्यांनी केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अनेक सरकारी एजन्सीना हाताशी धरून दहशत पसरविण्याचं काम केलं जात आहे. सरकारी संस्थांचा गैरवापर करणे भाजपाकडून शिकलं पाहिजे. लोकशाहीची नवीन परिभाषा ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सपासून तयार केली जात आहे. या संस्थांचा वापर करून भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांना धमकाविण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप अखिलेश यादव यांनी केला.
तसेच देशाची आणि राज्याची परिस्थिती नाजूक आहे. शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या बातम्या रोज वाचायला मिळतात. यूपीत कोणतीही मोठी गुंतवणूक झाली नाही. 70 लाख रोजगार निर्माण केले जातील त्या दाव्याचं झालं काय? बांग्लादेशातील पैशाची किंमत भारतापेक्षा अधिक झाली आहे असंही अखिलेश यादव यांनी सांगितले. यावेळी अखिलेश यादव यांनी दिल्लीतील समाजवादी पक्षाची कार्यकारणी बरखास्त केली.