काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर ४ वर्षात काय बदललं?, भाजपकडून व्हिडिओ शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 03:14 PM2023-08-05T15:14:23+5:302023-08-05T15:15:42+5:30
मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाला आता ४ वर्षे झाली आहेत
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा असलेलं कलम ३७० हटवण्याच्या निर्णय घेतला. देशाच्या स्वातंत्र्यापासून काश्मीर राज्याला असलेले काही विशेषाधिकार या कलमान्वये काढून घेण्यात आले. मोदी सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. मात्र, संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कामाला लावून आणि कुठेही अनुचित प्रकार न घडता कलम ३७० हटविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. आता, गेल्या ४ वर्षात काश्मीरमध्ये नेमकं काय बदललंय, याची माहितीच भाजपने व्हिडिओच्या माध्यमातून दिलीय.
मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाला आता ४ वर्षे झाली आहेत. त्यामुळे, या निर्णयाचा तेथील जनसामान्यांवर आणि देशावर काय परिणाम झाला, याची चर्चाही नेहमीच होत असते. यासंदर्भात भाजपने एक् व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, या निर्णयामुळे काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली असून विकासाने गती पकडल्याचं म्हटलं आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पार पडत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे, असे या व्हिडिओतून सांगण्यात आलंय.
या निर्णयामुळे काश्मीरसाठी वेगळा झेंडा आणि वेगळे कायदे रद्द झाले. काश्मीरच्या नागरिकांचं दुहेरी नागरिकत्व संपुष्टात आलं आणि जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याचा अधिकार सर्व भारतीयांना मिळाला. या ४ वर्षांत काश्मीरमधल्या दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आणि दहशतवाद्यांच्या कारवायादेखिल कमी झाल्या आहेत. याशिवाय काश्मिरी नागरिक भारतीयांच्या आणखी जवळ आले. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाला ४ वर्षे पूर्ण झाले असून भाजपने व्हिडिओच्या माध्यमातून याची माहिती दिली.
मोदींनी दाखवली कलम 370 हटविण्याची हिंमत.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 5, 2023
आता जम्मू काश्मीर घेऊ लागलाय मोकळा श्वास...
तिथे पोहचला आहे विकास.
-पंतप्रधान @narendramodi जी#370OutVikasIn#Ladakh#JammuAndKashmir#JammuKashmir#Act370#NarendraModi#BJP4INDpic.twitter.com/WDzd5w0JlS
गेल्या ४ वर्षात काश्मीरचं नशिब आणि चित्र बदललंय. काश्मीरमध्ये आता शाळा बंद आणि आंदोलनं इतिहास जमा झालं आहे. घुसकोरी करण्याची हिंमत आता दशतवाद्यांमध्ये राहिली नाही. कलम ३७० हटताच ९०० केंद्रीय कायदे काश्मीरमध्ये लागू करण्यात आले. तसेच, ५७,५०० कोटी रुपयांच्या विकास कामांना गती मिळाली आहे. चेनाना-नाशरी या देशातील सर्वात मोठा हायवे बोगदा येथे बनला आहे. दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेस वे काश्मीरची ओळख बनलीय. तसेच, चिनाब ब्रीज हा जगातील सर्वात उंच पुलही याच खोऱ्यात बांधून पूर्ण झाला आहे, अशी माहिती या व्हिडिओत देण्यात आली आहे.