दोन डोसनंतरही अँटीबॉडी विकसित झाली नाही तर? तज्ज्ञ म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 05:39 AM2021-09-05T05:39:13+5:302021-09-05T05:39:44+5:30
तज्ज्ञांनी सांगितले की, लसीच्या परिणामकारकतेचा सर्वांवर वेगवेगळा परिणाम होतो. काही लोकांमध्ये लस घेतल्यानंतरही अँटीबॉडी विकसित होत नसल्याचे दिसून आले आहे.
नवी दिल्ली : लसीकरणानंतर अनेक जणांनी अँटीबॉडी तपासणी केली असता, अँटीबॉडी विकसित होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे पुन्हा लस घ्यावी लागेल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
तज्ज्ञांनी सांगितले की, लसीच्या परिणामकारकतेचा सर्वांवर वेगवेगळा परिणाम होतो. काही लोकांमध्ये लस घेतल्यानंतरही अँटीबॉडी विकसित होत नसल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत एका लसीमुळे अँटीबॉडी तयार होत नसेल तर कुठली दुसरी लस घ्यावी का, असे लोकांकडून विचारले जात आहे. याबाबत जोधपूरमधील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे संचालक डॉ. अरुण शर्मा यांनी सांगितले की, अँटीबॉडी का विकसित झाली नाही, याचा शोध घेतला पाहिजे. शरीरामध्ये या संबंधीचे काही अडथळे आहेत जे अँटीबॉडी विकसित होण्यापासून रोखत आहेत हे जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे लस घेतल्यावरही अँटीबॉडी तयार होत नसेल तर सर्वप्रथम त्यामागचे कारण तपासले पाहिजे. त्यासाठी पॅथॉलॉजिस्टकडून संपूर्ण तपासणी करून घेतली पाहिजे.
तज्ज्ञ सांगतात...
तज्ज्ञ सांगतात की कोरोनामध्ये आपण शरीरामध्ये ह्युमोरल अँटीबॉडी पाहतो. ह्युमोरल इम्युनिटीला समजण्यासाठी टी सेल्स दोन प्रकारच्या असतात, हे जाणून घेतले पाहिजे. एक टी सेपरेशर सेल्स असते. आणि दुसरी टी हेल्पर सेल्स असते. टी हेल्पर सेल्स कोरोना विषाणूला ओळखण्याचे काम करते, तसेच विषाणूचा हल्ला झाल्यास त्याला ओळखते.