देवाच्या नावाने मते काय मागता? महागाई, राेजगारावरही आता बाेला! प्रियांका गांधी यांचे मोदींना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 05:41 AM2024-05-11T05:41:00+5:302024-05-11T05:41:30+5:30
आम्ही सुद्धा धार्मिक लोक आहोत, मात्र राजकारणात धर्म आणणे चूक आहे : प्रियांका गांधी यांची भाजपवर टीका
रायबरेली (उत्तर प्रदेश) : महागाई कशी नियंत्रणात आणणार किंवा लोकांना रोजगार कसा पुरवणार, यावर बोलण्याऐवजी सत्ताधारी भाजप देवाच्या नावावर मते मागत आहे, असा आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी येथे केला. अमेठी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा यांच्या प्रचारार्थ कोपरा सभांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. गेल्या ७० वर्षांमध्ये जे काम झाले नव्हते ते आपल्या सरकारने गेल्या दहा वर्षांत केले, असा दावा पंतप्रधान करतात. मात्र, वास्तविक परिस्थिती वेगळीच आहे, असे त्या म्हणाल्या.
‘आमच्या कुटुंबात लाेकांच्या सेवेची परंपरा’
nआम्ही सुद्धा धार्मिक लोक आहोत. आपल्या सर्वांसाठी देव आणि धर्म खूप प्रिय आहे. मात्र, राजकारणात धर्म आणणे चूक आहे. नेत्याने लोकांची सेवा करावी, ही येथील राजकारणाची परंपरा आहे आणि आमच्या कुटुंबाने या परंपरेचे पालन केले आहे, असेही त्या म्हणाल्या.
nअमेठीमधील काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा हे माझे क्लार्क आहेत ही भाजपने सुसंस्कृतपणाची पातळी सोडून केलेली टीका आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.
दहा वर्षांत काय केले, सांगा!
इराणी यांच्यावर हल्ला चढविताना प्रियांका म्हणाल्या की, राहुल यांचा पराभव करणे हा त्यांचा एकमेव उद्देश होता. तुमच्या खासदार आणि भाजपचे लोक केवळ निवडणुकीच्या वेळी तुमच्याकडे येतात.
ते महागाईला कसा आळा घालणार, शेतकऱ्यांची स्थिती कशी सुधारवणार, रोजगार देण्यासाठी काय करणार याबाबत बोलत नाहीत. ते गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामासाठी मते का मागत नाहीत, असा सवालही प्रियांका यांनी केला.