पंतप्रधान मोदींनी तमिळ लोकांशी हिंदीत संवाद साधला, भाषणात पहिल्यांदा एआयचा वापर केला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 02:35 PM2023-12-18T14:35:39+5:302023-12-18T14:39:47+5:30
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळ लोकांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी यांच्या भाषणावेळी पहिल्यांदाच AI या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. रविवारी त्यांनी सभेला जमलेल्या तमिळ जनतेशी 'भसिनी' या अनुवाद प्रणालीद्वारे थेट संवाद साधला. मोदींनी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या 'काशी-तमिळ संगम' कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांचे हिंदीतील भाषण तमिळमध्ये एआयद्वारे पहिल्यांदाच ट्रान्सलेट केले.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी तामिळ जनतेला इअरफोन लावण्याची विनंती केली. मोदी म्हणाले, 'हर हर महादेव! वनक्कम काशी. वनक्कम तामिळनाडू. जे तामिळनाडूहून आले आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पहिल्यांदा एआय तंत्रज्ञान वापरताना इअरफोन लावा.
पाकिस्तानात कुणी केला दाऊदवर विषप्रयोग?; 'या' लोकांभोवती फिरतेय संशयाची सुई
पीएम मोदी म्हणाले, 'हे ठीक आहे का? तामिळनाडूच्या मित्रांनो, हे ठीक आहे का? तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल का? माझा पहिलाच अनुभव आहे. मी भविष्यात ते वापरेन. तुम्ही मला अभिप्राय द्यावा. आता मी हिंदीत बोलेन, मला तामिळमध्ये उत्तर द्यायला मदत होईल.
भाषिणी काय आहे?
भाषिणी ही एक AI आधारित भाषांतर प्रणाली आहे, याद्वारे एखादी व्यक्ती स्वतःच्या भाषेत बोलू शकते, पण श्रोत्याला ते भारतातील इतर भाषांमध्ये देखील समजू शकते. हे Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. या अॅपमध्ये भाषादान नावाची सुविधा देखील आहे, याद्वारे वापरकर्ता देखील सिस्टममध्ये योगदान देऊ शकतो.
पीएम मोदी म्हणाले, 'तामिळनाडूतून काशीला येणे म्हणजे महादेवाच्या एका घरातून दुसऱ्या घरात येणे. तामिळनाडूतून काशीला येणे म्हणजे मदुराई मीनाक्षीहून काशी विशालाक्षीला येणे. म्हणूनच तामिळनाडूतील आणि काशीतील लोकांच्या हृदयात असलेले प्रेम आणि बंध वेगळे आणि अद्वितीय आहे. मला खात्री आहे, काशीची जनता तुमच्या सर्वांच्या सेवेत कोणतीही कसर सोडणार नाही.
मोदी म्हणाले, 'तुम्ही येथून निघाल तेव्हा बाबा विश्वनाथांच्या आशीर्वादासोबत काशीची चव, काशीची संस्कृती आणि काशीच्या आठवणीही घेऊन जाल. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा नवा वापरही येथे झाला आहे. ही एक नवीन सुरुवात आहे आणि आशा आहे की यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचणे माझ्यासाठी सोपे झाले आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.